
फोटो सौजन्य AI
तसेच दुष्काळग्रस्त कुटुंबांना अन्नधान्य किट देण्यासाठीही मदतीचा हात पुढे करण्यात आला. शिवसेना प्रवक्त्या सुशीबेन शहा यांनी या उपक्रमाची माहिती देताना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
स्वदेशी दिवाळी उत्सव २०२६ च्या दुसऱ्या दिवशी दुष्काळग्रस्त महिलांना शिलाई मशीन वाटप करण्याच्या उपक्रमासाठी इंडियन मर्चंट्स चेंबरच्या (IMC) माध्यमातून १५ लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. सुशीबेन शहा यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम राबविण्यात आला.
महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा, त्यातून त्यांना नियमित उत्पन्न मिळावे आणि कुटुंबाला आर्थिक आधार देता यावा, हा या मदतीमागील मुख्य उद्देश आहे. महिलांना केवळ आर्थिक मदत न देता त्यांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न असल्याचे शहा यांनी सांगितले.
दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून अन्नधान्य किट उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. यासाठी स्त्री शक्ती केंद्राच्या वतीने धनादेश सुपूर्द करण्यात आला.
याबाबत बोलताना सुशीबेन शहा म्हणाल्या की, दुष्काळग्रस्त कुटुंबांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना मदत करणे ही आपली जबाबदारी आहे. दिवाळीच्या आनंदात गरजू कुटुंबांचाही सहभाग असावा, हीच या उपक्रमामागील भावना आहे.
स्वदेशी दिवाळी उत्सवाच्या माध्यमातून भारतीय उत्पादनांचा वापर वाढविणे, स्थानिक उद्योजक आणि महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे यावर भर देण्यात आला आहे. विविध वस्तूंचे स्टॉल्स आणि कार्यशाळांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
उत्सवाच्या पहिल्या दिवशी शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी, सिद्धेश कदम, शीतल म्हात्रे, सुशांत शेलार, तृष्णा विश्वासराव, महाराष्ट्र भूषण सीमा सिंग, कला शिंदे, यामिनी जाधव आणि संध्या वढावकर यांनी उपस्थिती लावली.
दुसऱ्या दिवशी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार मिलिंद देवरा आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी उत्सवाला भेट दिली. त्यांनी विविध स्टॉल्सची पाहणी करून उद्योजकांशी संवाद साधला. कार्यशाळांमध्ये सहभागी महिलांचेही कौतुक केले. यावेळी शिवसेना उपनेत्या शिल्पा देशमुख उपस्थित होत्या.