
ऐन दिवाळीत ११००चे तिकीट १९००ला सणासुदीत लूट, कारवाईही निष्प्रभ; एजंटकडून मनमानी सुरू
मुंबई : सध्या दिवाळीनिमित्त शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत. बहुतांश नोकरवर्गही आपापल्या गावी जाताना दिसत आहे. त्यात नांदेड, कोल्हापूर, इंदूर यांसह अन्य शहरांकडे जाणाऱ्या बसची मागणी वाढली आहे. त्यामुळे तिकिटांचे दरही वाढले आहेत. दिवाळीनिमित्त गावी जाण्याची तयारी करणाऱ्या प्रवाशांच्या खिशावर खासगी बस ऑपरेटरांकडून डल्ला मारला जात आहे.
रेल्वेतील कन्फर्म तिकिटांची कमतरता आणि सणासुदीच्या काळात वाढणाऱ्या प्रवासी संख्येचा फायदा घेत बस ऑपरेटरांकडून मनमानी भाडे आकारले जात आहे. सामान्य दिवसांत ज्या प्रवासासाठी ९०० ते ११०० रुपये खर्च करावे लागतात, त्याच प्रवासासाठी दिवाळीत १९०० ते २२०० रुपयांपर्यंत मोजावे लागत आहेत. काही मार्गांवर एसी स्लीपर बसचे भाडे तब्बल ५००० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक भाडे आकारू नये, असा आरटीओचा इशारा आणि कारवाई करूनही प्रवाशांना दिलासा मिळताना दिसत नाही.
नोकरी करणारे, विद्यार्थी आणि अन्य शहरांत काम करणाऱ्या कामगारांसमोर सणासुदीला गावी जाण्यासाठी महागडे तिकीट खरेदी करण्याशिवाय फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. परतीच्या प्रवासातही प्रवाशांना याच समस्येला सामोरे जावे लागत आहे.
मनमानीवर हवा अंकुश
मनमानी भाडेवाढीचा अंदाज पुणे-इंदूर मार्गावरील उदाहरणावरून येतो. पुण्यातील एका क्रश आयर्न कंपनीत मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत असलेले दीपक सेन हे मूळचे इंदूरचे आहेत. ते साधारण दोन-तीन महिन्यांनी आपल्या गावी जातात. यंदा दिवाळीत त्यांना नॉन-एसी खासगी बसचे तिकीट १९०० रुपयांना बुक करावे लागले. सामान्य दिवसांत याच प्रवासाचे भाडे १००० ते ११०० रुपये असते. दीपक यांच्या म्हणण्यानुसार, सामान्य दिवसांत बसचे भाडे वाजवी असते; मात्र, होळी आणि दिवाळीसारख्या सणांमध्ये अनेकदा दुप्पट भाडे देऊन प्रवास करावा लागतो.
250 बसची तपासणी
पुणे आरटीओकडून २३ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबरदरम्यान विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांत आरटीओच्या भरारी पथकांनी सुमारे २५० खासगी बसची तपासणी केली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २० ऑपरेटरांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
नियमांपेक्षा अधिक भाडे आकारले जाऊ नये
नियमांपेक्षा अधिक भाडे आकारले जाऊ नये. याबाबत खासगी बस संचालकांना वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. आता पुन्हा लवकरच त्यांची बैठक घेऊन आवश्यक दिशानिर्देश दिले जातील.
– स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
FAQ
१. दिवाळीत खासगी बसच्या तिकीट दरांमध्ये किती वाढ?
सामान्य दिवसांत ९०० ते ११०० रुपये असणारे तिकीट दिवाळीत १९०० ते २२०० रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
२. कोणत्या शहरांकडे जाणाऱ्या बसची मागणी वाढली?
नांदेड, कोल्हापूर, इंदूर यांसह अन्य शहरांकडे जाणाऱ्या बसची मागणी वाढली आहे.
३. एसी स्लीपर बसचे भाडे किती झाले आहे?
काही मार्गांवर एसी स्लीपर बसचे भाडे तब्बल ५००० रुपयांपर्यंत पोहोचले आहे.