
फोटो सौजन्य AI
मुंबईतील सुमारे १० हजार २०० अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या बँक खात्यांमध्ये यंदाची भाऊबीज भेट जमा करण्यात आली आहे. बाल विकास प्रकल्प अधिकारी भाऊसाहेब तोरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. दिवाळीपूर्वीच ही रक्कम मिळाल्याने अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन सणानिमित्त ही भेट देण्यात आली आहे.
अंगणवाडी सेविका महिला व बालविकास विभागाच्या विविध योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात. गरोदर माता, स्तनदा माता, नवजात बालके आणि सहा वर्षांखालील मुलांचे पोषण व आरोग्य संवर्धन ही त्यांची महत्त्वाची जबाबदारी आहे.
बालकांचे वजन आणि उंची मोजणे, कुपोषणाचे सर्वेक्षण, माता-बालकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन तसेच पूर्वप्राथमिक शिक्षण देण्याचे कामही त्या करतात. याशिवाय पोषण ट्रॅकर प्रणालीवर लाभार्थ्यांची नोंदणी, बालकांच्या वाढीचे निरीक्षण आणि पोषण आहार वितरणाची नोंद ठेवण्याची जबाबदारीही त्या पार पाडतात. या संपूर्ण प्रक्रियेत अंगणवाडी मदतनीस यांचेही योगदान महत्त्वाचे आहे.
यापूर्वी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना भाऊबीज भेटीचे वाटप जिल्हास्तरावरून करण्यात येत होते. मात्र, यंदा एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयामार्फत थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये रक्कम जमा करण्यात आली आहे. त्यामुळे वितरण प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक झाली आहे.
लाभार्थ्यांना कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट आर्थिक लाभ मिळाला आहे. दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट मिळाल्याने सेविका आणि मदतनीसांचा उत्साह वाढण्यास मदत होणार आहे. त्यांच्या योगदानाचा सन्मान करणारा हा उपक्रम असल्याचे बाल विकास प्रकल्प अधिकारी भाऊसाहेब तोरकर यांनी नमूद केले.