
मुंबईकर माफ करणार नाहीत'; अमित साटमांच्या व्हायरल व्हिडीओवर आदित्य ठाकरेंचा घणाघात
मुंबई : मुंबई आणि उपनगरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे झाड कोसळणे, उघडे मॅनहोल आणि खड्ड्यांमुळे अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून ११ वर्षीय मुलाचा मृत्यू आणि साकीनाक्यात उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू या घटनांमुळे मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर टीका होत आहे.
या घटनांदरम्यान भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावरून वाद निर्माण झाला आहे. अमित साटम यांच्या व्हायरल व्हिडिओनंतर यावर आता प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी याबाबत प्रतिक्रिया देत अमित साटम यांच्यावर खरमरीत टीका केली आहे.
आपल्या अधिकृत ‘X ‘ अकाउंटवरून पोस्ट करत ते म्हणाले, “हे अत्यंत लज्जास्पद आहे की, विधान भवनाच्या पायऱ्यांवर उभे राहून भाजपच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष ‘साटम‘ हे मुंबईतील पहिल्या पावसात दोन नागरिकांच्या झालेल्या मृत्यूबाबत हसत-खिदळत विनोद करू शकतात.”
“एका मुलाचा झाड पडून झालेला मृत्यू आणि त्यानंतर मॅनहोलमध्ये पडून दुसऱ्या व्यक्तीचा झालेला मृत्यू – या दुर्दैवी घटनांवर चर्चा सुरू असताना ते हसत होते; त्यांच्या या विचित्र विनोदी वृत्तीचे चित्रण न्यूज चॅनेल्सनी टिपले आहे.”
Truly disgraceful that the BJP’s Mumbai unit president- Satam, can joke and laugh about the 2 deaths of Mumbaikars in the first rains in Mumbai on the steps of the Vidhan Bhavan. He was laughing about Mumbaikars discussing the death of a child in a tree fall incident, followed… — Aaditya Thackeray (@AUThackeray) July 3, 2026
“शहराचा कारभार नीट चालवण्यात आपल्याच पक्षाचे अपयश झाकण्याऐवजी त्यावर असे क्रूर विनोद करणाऱ्या या निर्लज्ज व्यक्तीला कोणत्याही जबाबदार पक्षाने तातडीने पदावरून हटवले असते.”
“मुंबई हे नक्कीच लक्षात ठेवेल आणि आपल्या अत्यंत खराब कारभाराची थट्टा करणाऱ्या भाजपला कधीही माफ करणार नाही!” अश्या शब्दांत त्यांनी अमित साटम यांच्या कृतीचा समाचार घेतला.
व्हायरल व्हिडीओमध्ये आमदार अमित साटम हे विधानभवनाच्या पायऱ्यांजवळ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते जयंत पाटील यांच्याशी बोलताना दिसतात. त्यावेळी ते “काल झाडावर होतं, आज मॅनहोल झालं…” असे म्हणत स्मितहास्य करताना दिसतात.
या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. गंभीर दुर्घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर अशा विषयावर हसत बोलल्याचा आरोप करत विरोधकांसह अनेकांनी साटम यांच्यावर टीका केली.
दरम्यान, याबाबत अमित साटम यांनीदेखील आपली प्रतिक्रिया दिली असून वाद वाढल्यानंतर त्यांनी या व्हिडीओबाबत स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, “अर्थाचा अनर्थ करण्याचा प्रयत्न होत आहे. बातम्या देण्यापेक्षा बातम्या तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.”
‘विरोधक केवळ राम मंदिरावरून राजकारण करतायत’; शिंदे गटाच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाना
साटम म्हणाले की, सभागृहात मॅनहोलच्या घटनेवर चर्चा सुरू असताना जयंत पाटील तेथे आले. त्यांनी मागील दिवशी झाड कोसळण्याच्या घटनेवर भाषण केल्याचे सांगितले. त्यावर आपण “काल झाड पडल्याबाबत बोललो होतो, आज मॅनहोलमध्ये माणूस पडल्याच्या घटनेवर बोललो,” असे म्हटले. त्यानंतर जयंत पाटील यांनी हसत प्रतिसाद दिला आणि पाठीवर थाप मारून पुढे निघून गेले. आपणही त्यांना केवळ स्मितहास्याने प्रतिसाद दिला, असा दावा साटम यांनी केला.
अमित साटम यांनी माध्यमांनाही आवाहन करत, “व्हिडीओ तोडून-मोडून दाखवू नयेत. संपूर्ण संदर्भासह वस्तुस्थिती मांडावी,” असे म्हटले. दरम्यान, या प्रकरणामुळे मुंबईतील पावसाळी सुरक्षेचा मुद्दा आणि लोकप्रतिनिधींच्या सार्वजनिक वर्तनाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.