'काल झाड, आज मॅनहोल…' म्हणत मुंबईतील दुर्घटनांवर भाजप आमदाराचा हास्यविनोद, अमित साटम यांच्या व्हायरल व्हिडीओवरून नवा वाद
मुंबई : मुंबई आणि उपनगरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे झाड कोसळणे, उघडे मॅनहोल आणि खड्ड्यांमुळे अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून ११ वर्षीय मुलाचा मृत्यू आणि साकीनाक्यात उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू या घटनांमुळे मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर टीका होत आहे.
या घटनांदरम्यान भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावरून वाद निर्माण झाला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये आमदार अमित साटम हे विधानभवनाच्या पायऱ्यांजवळ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते जयंत पाटील यांच्याशी बोलताना दिसतात. त्यावेळी ते “काल झाडावर होतं, आज मॅनहोल झालं…” असे म्हणत स्मितहास्य करताना दिसतात.
‘विरोधक केवळ राम मंदिरावरून राजकारण करतायत’; शिंदे गटाच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाना
या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. गंभीर दुर्घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर अशा विषयावर हसत बोलल्याचा आरोप करत विरोधकांसह अनेकांनी साटम यांच्यावर टीका केली.
वाद वाढल्यानंतर अमित साटम यांनी या व्हिडीओबाबत स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, “अर्थाचा अनर्थ करण्याचा प्रयत्न होत आहे. बातम्या देण्यापेक्षा बातम्या तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.” साटम म्हणाले की, सभागृहात मॅनहोलच्या घटनेवर चर्चा सुरू असताना जयंत पाटील तेथे आले. त्यांनी मागील दिवशी झाड कोसळण्याच्या घटनेवर भाषण केल्याचे सांगितले. त्यावर आपण “काल झाड पडल्याबाबत बोललो होतो, आज मॅनहोलमध्ये माणूस पडल्याच्या घटनेवर बोललो,” असे म्हटले.
साहेब…काल झाडावरती होतं आज मॅन होल मध्ये झालं…
तेही हसत…
झाड पडून शाळकरी लहान मुलगा ठार झाला याचेही यांना भान नाही.. pic.twitter.com/VmvscaunlP — यदुनाथ जवळकर🔥 (@yadujavalkar) July 3, 2026
त्यानंतर जयंत पाटील यांनी हसत प्रतिसाद दिला आणि पाठीवर थाप मारून पुढे निघून गेले. आपणही त्यांना केवळ स्मितहास्याने प्रतिसाद दिला, असा दावा साटम यांनी केला.
उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का! महिला उपनेत्या हजारो कार्यकर्त्यांसह करणार शिंदेसेनेत प्रवेश
अमित साटम यांनी माध्यमांनाही आवाहन करत, “व्हिडीओ तोडून-मोडून दाखवू नयेत. संपूर्ण संदर्भासह वस्तुस्थिती मांडावी,” असे म्हटले. दरम्यान, या प्रकरणामुळे मुंबईतील पावसाळी सुरक्षेचा मुद्दा आणि लोकप्रतिनिधींच्या सार्वजनिक वर्तनाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.






