Mumbai-Jodhpur Air India Flight: मुंबईहून जोधपूरला जाणारं एअर इंडियाचं AI 645 विमान शुक्रवारी अचानक मुंबई विमानतळावर परत उतरवण्यात आलं. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचं लक्षात येताच पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. यामुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
एअर इंडियाचं विमान नेहमीप्रमाणे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेत होतं. टेक-ऑफ झाल्यावर लगेचच कॉकपिटमध्ये काही ऑपरेशनल समस्या असल्याचं पायलटच्या निदर्शनास आलं. त्यांनी कोणताही धोका न पत्करता लगेचच विमान परत आणण्याचा निर्णय घेतला. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, पायलटने स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) फॉलो करत विमान सुरक्षितपणे पुन्हा विमानतळावर उतरवलं. या घटनेमुळे प्रवासी थोडे घाबरले होते, पण पायलटच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
Air India Spokesperson says, “Flight AI645 operating from Mumbai to Jodhpur on 22 August returned to the bay due to an operational issue. The cockpit crew decided to discontinue the take-off run following standard operating procedures and brought the aircraft back. Alternative…
— ANI (@ANI) August 22, 2025
एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, ऑपरेशनल अडचणींमुळे विमान परत बोलावण्यात आले. कॉकपिट क्रूने मानक कार्यपद्धतींनुसार उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि विमान परत आणले. प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर नेण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली.
याआधी, जून महिन्यात अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात झाला होता. त्यात २४० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या पार्श्वभूमीवर मुंबईतील ही घटना अत्यंत महत्त्वाची ठरते. पुन्हा एकदा अशा प्रकारचा अपघात टळल्याने एअर इंडियाची सुरक्षा प्रक्रिया आणि पायलटची दक्षता कौतुकास्पद ठरली आहे.