मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंशी युतीबाबत केलं मोठं विधान; म्हणाले, 'उद्धव ठाकरेंशी पुन्हा युती...'
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच शिवसेना पक्षफुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट वेगळे झाले आहेत. एकनाथ शिंदेंची शिवसेना सध्या भाजपसोबत आहे. त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेशी भाजप युती करेल का यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. ‘उद्धव ठाकरेंशी पुन्हा युती शक्य नाही’, असे त्यांनी म्हटले आहे.
एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरेंशी पुन्हा युती करणार का? या प्रश्नावर फडणवीस यांनी तातडीने उत्तर देत नाही असे म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, गेल्या पाच वर्षांत उद्धव ठाकरेंशी माझे संबंध राहिलेले नाहीत. कारण त्यांनीच ते तोडून टाकले. आमच्यात मारामारी नाही, समोर आलो तर आम्ही एकमेकांशी बोलतो. पण, उद्धव ठाकरेंनी सगळे संबंध तोडून टाकले, असेही देवेंद्र फडणवीस यांनी या मुलाखतीत सांगितले आहे.
संजय राऊत यांना मानसोपचाराची गरज
देवेंद्र फडणवीस संजय राऊत यांच्याबद्दल म्हणाले की, संजय राऊतांना स्वतः चा तपास करून घेण्याची गरज आहे. अनेक चांगली मानसोपचार रुग्णालये सुरू झाली आहेत. आवश्यकता असेल तर आम्ही सरकारच्यावतीने सर्व खर्च करू. अगदी आवश्यकता पडली तर मला कोणीतरी सांगितले की, सिंगापूरचे मानसोपचार रुग्णालय खूप चांगले आहे, तिथेही त्यांना पाठवायचे असेल तर त्याहीकरिता सगळा खर्च सरकार देईल, असा टोला फडणवीस यांनी लगावला.
गुप्तचर यंत्रणेचे अपयश म्हणता येणार नाही
नागपूर पोलिसांबाबत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ‘नागपूरमधील हिंसाचाराला गुप्तचर यंत्रणेचे अपयश म्हणता येणार नाही. मात्र, दुपारनंतर सोशल मीडियावर जसे लक्ष ठेवले पाहिजे तसे ठेवण्यात आले नाही. सोशल मीडियावरून प्रक्षोभक पोस्ट पसरवण्यात आल्या. आमच्याकडे सोशल मीडिया मॉनिटरिंग क्षमता आहेत. परंतु, त्याची सवय होण्यासाठी थोडेसे करावे लागेल. आता रस्त्यावर हिंसाचार कमी आणि सोशल मीडियाद्वारे जास्त होतो.