शिवडी-परळ भागात महापालिकेचा मनमानी कारभार; अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांचा ‘हंडा मोर्चा’
मुंबई: शिवडी परळ भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत रितसर तक्रार करुनही पालिकेने नागरिकांच्या समस्यांकडे डोळेझाक केली आहे असा आरोप करण्यात आलेला आहे. रोजच्या त्रासाला कंटाळून संतप्त नागरिकांनी आज महानगरपालिकेच्या कार्यालयावर हंडा मोर्चा आंदोलन केलं आहे. महाविकास आघाडीतील शिवडी विधानसभेचे आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांना हे आंदोलन केलं आहे.
शिवडी-परळ विभागातील पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी, महानगरपालिकेच्या एफ दक्षिण विभाग कार्यालयावर धडक ‘हंडा मोर्चा’ नेण्यात आला. येत्या दसऱ्यापर्यंत माझ्या मायभगिनींचा पाणी प्रश्न हा सुटलाच पाहिजे, असा इशारा आमदार अजय चौधरी यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. त्याचबरोबर शिष्टमंडळाला रीतसर निवेदन देऊन, पाणी प्रश्नावर त्वरित कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती देखील करण्यात आली आहे.
शिवडी परळ भागातील नागरिकांच्या या समस्येला महायुती सरकार जबाबदार असल्याची टीका आमदार अजय चौधरी यांनी केली आहे. अजय चौधरी म्हणाले की, ज्या विभागात विरोधी पक्षातील आमदार आहेत; त्या त्या भागातील स्थानिकांना जाणूनबुजून त्रास देण्याची, त्यांच्या समस्या वाढविण्याची मिंधे-भाजप सरकारची नीती आहे. सर्व सामान्य मध्यमलवर्गीय नागरिकांच्या पाण्याच्या समस्येकडे ठरवून दुर्लक्ष करणाऱ्यांना कार्यकर्ते म्हणावं का ? असा अजय चौधरी य़ांनी मिंधे भाजप सकरावर हल्लाबोल केला आहे.
अजय चौधरी पुढे असंही म्हणाले की, ह्या महायुती सरकारच्या सत्ताधारी कपटीपणापुढे आम्ही कधीच हतबल होणार नाही. शिवडी-परळवासियांच्या हक्कासाठी मी अजय चौधरी सदैव लढत राहणारच, त्यांना त्यांचा हक्क मिळवून देणारच असं आश्वासन त्यांनी शिवडी परळ भागातील नागरिकांना दिलं आहे.