
Kishori Pednekar
मुंबई : मुंबई महापालिकेच्या कारभारावरून राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मंडपेश्वर शाळेच्या भूखंडापासून ते मुंबईतील प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांपर्यंत अनेक मुद्द्यांवर महापालिका प्रशासनाला जाब विचारला आहे. बिल्डरकडून भूखंडाचा वापर होत असल्याचा आरोप करत त्यांनी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले. (BMC News)
मंडपेश्वर शाळेच्या जागेचा बिल्डरकडून वापर केला जात असल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला. या जागेची आपण स्वतः पाहणी केल्याचे सांगत त्यांनी महापालिकेच्या डीएमसी अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शाळेतील मुलांना याच परिसरातून ये-जा करावी लागत असताना बिल्डरला मात्र मोकळीक दिली जात असल्याचे त्या म्हणाल्या.
विशेष म्हणजे, आपण पाहणी केल्यानंतर अवघ्या पाच तासांत परिसर स्वच्छ करण्यात आला. मात्र, अनेक महिन्यांपासून या जागेचा वापर होत असताना संबंधितांवर काय कारवाई झाली, असा सवाल त्यांनी केला.
मुंबईतील भूखंडांच्या व्यवस्थापनावरूनही पेडणेकर यांनी प्रशासनाला लक्ष्य केले. वरळीतील भूखंडांचा उल्लेख करत केवळ झुडपे लावून जागा व्यवस्थित असल्याचे दाखवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
गेल्या चार वर्षांतील महापालिकेच्या कामकाजाची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी मागणीही त्यांनी केली. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात काय कामे झाली आणि महायुतीच्या काळात काय कामे झाली, याचा स्पष्ट हिशेब मुंबईकरांसमोर यायला हवा, असे त्या म्हणाल्या.
प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेने आखलेल्या नियोजनावरही त्यांनी आक्षेप घेतला. २३३ टँकरच्या माध्यमातून ७१४ रस्ते धुण्याचे नियोजन असून त्यासाठी विहिरींचे पाणी वापरले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आधीच पाण्याची कमतरता असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी कुठून आणणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सर्वसामान्य नागरिकांनी शेकोटी पेटवल्यास दंड आकारला जातो. मग मोठ्या हॉटेलमधील धुराच्या चिमण्यांवर काय कारवाई होणार, असा सवालही पेडणेकर यांनी केला.
एकूणच, भूखंड व्यवस्थापन, पाणी वापर आणि प्रदूषण नियंत्रण या मुद्द्यांवरून किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महापालिका प्रशासनाला अनेक प्रश्न विचारले आहेत. आता प्रशासन या आरोपांना आणि प्रश्नांना काय उत्तर देते, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
Ans: मंडपेश्वर शाळेच्या भूखंडाचा बिल्डरकडून वापर, भूखंड व्यवस्थापनातील अनियमितता आणि प्रदूषण नियंत्रणाच्या नियोजनावरून त्यांनी महापालिका प्रशासनावर आरोप केले.
Ans: किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, २३३ टँकरच्या माध्यमातून ७१४ रस्ते धुण्याचे नियोजन आहे. यासाठी विहिरींचे पाणी वापरण्यात येणार असल्याचा त्यांनी उल्लेख केला.
Ans: गेल्या चार वर्षांतील मुंबई महापालिकेच्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर यावा. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात आणि महायुतीच्या कार्यकाळात नेमकी कोणती कामे झाली, हे स्पष्ट व्हावे, यासाठी त्यांनी श्वेतपत्रिकेची मागणी केली.