
नाना पटोलेंवर पैसे घेऊन पदवाटपाचा गंभीर आरोप, दोन जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या रद्द
विधानसभा निवडणुकीत पानिपत झाल्यानंतर काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के बसू लागले आहेत. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर पैसे घेऊन पदवाटप केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. आता काँग्रेसनं या आरोपांची गंभीर दखल घेत नांदेड आणि नवी मुंबई जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे. हा पटोलेंना मोठा धक्का मानला जात आहे.
काही दिवसांपूर्वीच नवी मुंबईतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर रमाकांत म्हात्रे यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देताना काँग्रेसमध्ये विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी पक्षातील दोन नानांपैकी एका नानानं 4 कोटींची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला होता. यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी आरोपांची गंभीर दखल घेत नांदेड आणि नवी मुंबईतील नियुक्तीलाच स्थगिती दिली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नांदेड, नवी मुंबईतील जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली होती.पण आता चेन्निथला यांनी या नियुक्तीच रद्द केल्या आहेत. पटोले यांनी या नियुक्त्या करताना ऑल इंडिया कमिटीची परवानगी घेतली नसल्याचा ठपका ठेवत चेन्निथला यांनी हा निर्णय घेतला आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या गोटात काही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे. एकीकडे निवडणुकीतील अपयशाची जबाबदारी घेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठवला आहे. त्यावर नवा प्रदेशाध्यक्षाची नियुक्तीचा निर्णय अद्याप बाकी असतानाच आता काँग्रेसमध्ये अनेक नेते पक्षाला रामराम ठोकण्याच्या विचारात असल्याचं बोललं जात आहे.
त्यातच आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पैसे घेऊन पदवाटप करत असल्याचा आरोप नवी मुंबईतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमाकांत म्हात्रे यांनी केला होता. हा आरोप करतानाच त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. या आरोपांमुळे काँग्रेस आता अलर्ट मोडवर आली असून आता आगामी काळात मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे.