
"आम्ही शेतकरी आहोत घाबरणारे नाही...", काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्याने यशोमती ठाकूर आक्रमक
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आज अमरावती तालुक्यातील शिराळा येथे कृषि मेळावा आणि कृषी पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त दौऱ्यावर आले असता, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर युवक काँग्रेस आणि एनएसयुआयच्या पदाधिकाऱ्यांनी कृषि मंत्र्यांविरोधात निदर्शने करण्याच्या तयारीत होते. मात्र पोलिसांनी युवक काँग्रेसचे अमरावती तालुका अध्यक्ष शैलेश काळबांडे आणि अमरावती एनएसयुआयचे अध्यक्ष सर्वेश खांडे यांना नजरकैदेत ठेवले. याची माहिती यशोमती ठाकूर यांना समजताच त्यांनी अमरावती मधील पोटे टाऊनशीप येथून एनएसयुआय व युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांच्या नजर कैदेतून सुटका केली.
यावेळी यशोमती ठाकूर म्हणाल्या, पोलिसांनी वर्दीचा गैरफायदा घेऊ नये. आम्ही पोलिसांना घाबरत नाही. आंदोलन दडपण्यासाठी सत्ता पक्षाच्या दबावाखाली पोलिस कारवाई होत आहे. मी माझ्या कार्यकर्त्यांना सोडवून आणले, मी कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहे, आम्ही पोलिसांना घाबरत नाही. पोलिसांनी वर्दीचा गैरफायदा घेऊ नये.
कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन दडपशाही कराल तर त्याला आम्ही घाबरणारे नाही. अजित पवार, एकनाथ शिंदे घाबरुन सत्तेत जाऊ शकतात. आम्ही घाबरणारे नाही. आम्ही शेतकरी लोक आहोत. आमच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. कार्यकर्त्यांना नजर कैदेत ठेवल्याचे मला समजले, मी कार्यकर्त्यांना सोडवून आणले, पोलिसांना सांगितले तुम्हाला काय करायचे करा, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.
अमरावतीत संजय खोडके यांची दादागिरी चालली आहे. अमरावती महापालिकेची खुली जागा हडपण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आता एपीएमसीची जागा हडपण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोप यशोमती ठाकूर यांनी केला.