
धावती लोकल पकडताना ७० वर्षीय वृद्धाचा जीव धोक्यात; डोंबिवली जीआरपीच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली
अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना डोंबिवली रेल्वे स्थानकात घडली. डोंबिवली स्थानक नेहमीप्रमाणे प्रवाशांनी गजबजलेले असताना ७० वर्षीय पंडित वाघ हे प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर उभे होते. यावेळी त्यांनी धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालत्या ट्रेनमध्ये चढताना त्यांचा तोल गेला आणि ते प्लॅटफॉर्म व लोकलच्या मधील धोकादायक फटीत अडकण्याच्या स्थितीत आले. काही क्षणांसाठी त्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला होता. याच वेळी डोंबिवली जीआरपीचे पोलिस कर्मचारी अनिल शेळके यांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ धाव घेतली आणि वयोवृद्धाला सुरक्षितपणे बाहेर खेचले. त्यांच्या तत्परतेमुळे संभाव्य अनर्थ टळला आणि पंडित वाघ यांचा जीव वाचला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आणि वृद्धाचा जीव वाचला.
या घटनेनंतर पंडित वाघ यांनी पोलिस कर्मचारी अनिल शेळके यांचे आभार मानले. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलिस कर्मचाऱ्याच्या धाडसाचे आणि तत्परतेचे कौतुक केले जात आहे. रेल्वे प्रशासन आणि पोलिसांकडून वारंवार जनजागृती करूनही अनेक प्रवासी धावती ट्रेन किंवा लोकल पकडण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रवाशांनी चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न न करता सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
ही संपूर्ण घटना स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन केले आहे. तसेच, काही क्षणांचा विलंब सहन करून स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.