
Mumbai News: घाटकोपरमध्ये दरड कोसळली! अनेक घरे मलब्याखाली; 6 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू
#WATCH | Mumbai: A landslide occurred at Gaushiya Chawl, Chirag Nagar, near Rathod Medical in Kurla, at around 3:48 am. Two bodies have been recovered, and 6-8 persons are likely to be trapped. Rescue operation is underway. (Source: NDRF) pic.twitter.com/aiDt2V38nZ — ANI (@ANI) August 12, 2026
मुंबईतील घाटकोपर पश्चिम परिसरातील अशोक नगर परिसरात आज पहाटे सुमारे 3:48 वाजण्याच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली. या घटनेत अनेक घरं मलाब्याखाली दबली गेली. अचानक झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आणि नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घाटकोपरमध्ये घडलेल्या या घटनेत सुमारे 6 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी एनडीएरएफ आणि पोलिसांचे पथक युद्धपातळीवर बचावकार्य करत आहेत. घटनास्थळी सध्या मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला आहे.
मुंबई पोलीस आणि बृहन्मुंबई महानगरपालिकाने दिलेल्या माहितीनुसार, बचाव कार्य अजूनही सुरु आहे. अधिकारी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे घटनास्थळी उपस्थित आहेत. मुंबई पालिकेच्या महापौर रितू तावडे यांनी घाटकोपर दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पालिकेकडून 3 लाखांची मदत जाहीर केली आहे.
एका बीएमसी अधिकाऱ्याने सांगितलं आहे की, मुंबई अग्निशमन दल (MFB), पोलीस, १०८ रुग्णवाहिका सेवा, एनडीआरएफ (NDRF) आणि वॉर्डातील कर्मचाऱ्यांची पथके घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत. घाटकोपरचे उपायुक्त गणेश शिंदे यांनी म्हटलं आहे की, सतत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अशोक नगर परिसरात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या ठिकाणी सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. एका अधिकाऱ्याने म्हटलं आहे की, पावसाळ्यापूर्वीच या परिसरातील अनेक घरांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. सध्या इतर अधिकारी या परिस्थितीचा आढावा घेत आहेत. गरज भासल्यास या भागातील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवले जाऊ शकते.