
साहिल वाकोडे प्रकरणात प्राध्यापकाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा
IIT Bombay Student Suicide : मुंबईतील IIT मुंबईमध्ये बी.टेकच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या साहिल वाकोडेच्या मृत्यूनंतर प्रकरणाला गंभीर वळण मिळालं आहे. साहिलच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीही लागू करण्यात आल्या आहेत. तपास आता मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.
साहिलच्या वडिलांनी आपल्या तक्रारीत गेल्या काही महिन्यांपासून मुलाचा जातीय आधारावर छळ केल्याचा आरोप केला आहे. प्राध्यापकांकडून जातीय स्वरूपाचे अपशब्द वापरण्यात आल्याचाही दावा त्यांनी केला आहे. तक्रारीत IIT मुंबईचे संचालक शिरीष बी. केदारे यांच्यासह काही प्राध्यापक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, हे सर्व आरोप सध्या तपासाचा भाग असून त्यांची स्वतंत्र चौकशी सुरू आहे.
दरम्यान, साहिलच्या मृत्यूच्या काही तास आधी तो परीक्षेला बसला होता. परीक्षेदरम्यान त्याच्याकडे मोबाईल आढळल्याचं IIT मुंबईने म्हटलं आहे. संस्थेच्या म्हणण्यानुसार, प्रश्नपत्रिका ChatGPT वर अपलोड करून उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न केल्याचं निदर्शनास आलं होतं. मात्र, या प्रकरणी साहिलवर कोणतीही औपचारिक शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली नव्हती, असा IITचा दावा आहे. प्रशिक्षक आणि विभागप्रमुखांनी त्याच्याशी संवाद साधून समुपदेशन केलं आणि या घटनेचा त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर परिणाम होणार नसल्याचं सांगितल्याचं संस्थेने स्पष्ट केलं आहे.
दुसरीकडे, साहिलच्या कुटुंबीयांनी संस्थेच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. कुटुंबीयांच्या आरोपांनुसार साहिलला बराच काळ मानसिक त्रास सहन करावा लागत होता. या आरोपांची सत्यता तपासण्यासाठी पोलिसांकडून विविध बाजूंनी चौकशी केली जात आहे. IIT मुंबईचे संचालक शिरीष केदारे यांनी संस्थेत जातीय भेदभाव होत असल्याचा आरोप नाकारला आहे.
साहिलच्या मृत्यूनंतर IIT कॅम्पसमधील विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावाचा मुद्दाही पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्वतंत्रपणे संकलित केलेल्या Global IIT Alumni Support Group च्या आकडेवारीनुसार, मागील दोन दशकांत IIT व्यवस्थेत किमान 160 विद्यार्थी आत्महत्येमुळे मृत्युमुखी पडल्याची नोंद आहे. ही अधिकृत सरकारी सर्वसमावेशक आकडेवारी नसून स्वतंत्र संकलन असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
आता साहिल वाकोडे प्रकरणात पोलिसांच्या तपासातून नेमकी कारणं आणि तक्रारीतील आरोपांमध्ये तथ्य किती आहे, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील तपास आणि अहवालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.