‘ज्यांनी गुन्हा केलाय त्यांना कायद्याच्या चौकटीत आणलं पाहिजे’, निलेश राणेंचं मोठं वक्तव्य
Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर CBIने या प्रकरणात FIR दाखल करून तपास सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं आहे. तपास सुरू असताना कोण आरोपी आहे किंवा कोण नाही, याबाबत आताच भाष्य करणं योग्य ठरणार नाही, असं राणे यांनी स्पष्ट केलं.
माध्यमांशी बोलताना निलेश राणे म्हणाले की, “CBIने मालवणी पोलिसांकडून CDR, टॉवर लोकेशन रिपोर्ट आणि पोस्टमार्टम रिपोर्ट यांसारखी कागदपत्रं मागवली आहेत. आता CBI या सर्व बाबींच्या आधारे तपास करणार असून, प्रकरणात नेमकं कोण दोषी आहे, हे तपासानंतरच स्पष्ट होईल,” असं त्यांनी सांगितलं.
‘ज्यांनी गुन्हा केलाय, त्यांना सगळ्यांना कायद्याच्या चौकटीत आणलं पाहिजे. पण ते कोण असावेत हे मी आता सांगू शकत नाही. तपासानंतरच ते समोर येईल,’ अशी भूमिका राणेंनी मांडली.
या प्रकरणात सतीश सालियान यांचे वकील निलेश ओझा यांनी न्यायालयासमोर काही पुरावे सादर केल्याचाही राणेंनी उल्लेख केला. प्रकरणातील काही बाबी जुळत नसल्याचा दावा करत, पुढील न्यायालयीन प्रक्रियेत पुरावे आणि तथ्यांवर चर्चा होईल, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, दिशा सालियन प्रकरणात CBIने FIR दाखल केल्यानंतर राजकीय वातावरण आणखी तापलं आहे. हायकोर्टाने 2 सप्टेंबर रोजी CBIला तपास करण्याचे निर्देश दिल्यानंतर FIR नोंदवण्यात आली. याच पार्श्वभूमीवर सतीश सालियान यांनी आदित्य ठाकरे यांच्याविरोधात 500 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस बजावली. शनिवारी ते वकिलांसह मातोश्रीवर पोहोचले. नोटीसमध्ये सात दिवसांत सार्वजनिक माफी मागण्याची मागणी करण्यात आली असून, माफी न मागितल्यास 500 कोटींचा दावा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नोटीशीच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची गर्दी झाली आणि काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी नोटीस स्वीकारली.
Disha Salian Case : सतीश सालियान वकिलांसह मातोश्रीवर, वरुण सरदेसाईंचा पलटवार; ‘पुरावे असतील तर द्या’
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन यांना ओळखत नसल्याचं सांगत त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. त्यामुळे एका बाजूला सतीश सालियान यांची कायदेशीर भूमिका, तर दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे यांच्याकडून आरोपांना दिलेला नकार आणि आता सुरू झालेला CBI तपास, यामुळे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. आता CBIच्या तपासातून कोणती माहिती समोर येते आणि न्यायालयीन प्रक्रियेत पुढे काय घडतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.






