IIT मुंबईत विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं, अभिजीत दीपके सरकारवर बरसले
IIT Bombay Student Suicide : मुंबईतील प्रतिष्ठित आयआयटी मुंबईमध्ये द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येने कॅम्पसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग (Energy Science and Engineering) विभागात बीटेकचं (B.Tech) शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्याचा 18 सप्टेंबर रोजी गळफास घेऊन आयुष्य संपवल्याचा प्रकार समोर आला आहे.
या घटनेनंतर IIT मुंबईच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन केलं. 400 हून अधिक विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाल्याची माहिती समोर आली आहे. यावर आता कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
या घटनेची पार्श्वभूमीही सध्या चर्चेत आहे. IIT मुंबईच्या अधिकृत माहितीनुसार, परीक्षेदरम्यान संबंधित विद्यार्थी मोबाईल वापरताना आढळला होता. त्याने परीक्षेची प्रश्नपत्रिका ChatGPT वर अपलोड करून उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न केल्याचं संस्थेने म्हटलं आहे. मात्र, या प्रकरणात त्याच्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली नव्हती, असा दावा IIT मुंबईने केला आहे.
विभागप्रमुख आणि संबंधित प्राध्यापकांनी विद्यार्थ्याशी चर्चा करून त्याचं समुपदेशन केलं होतं. तसेच या घटनेचा त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर विपरीत परिणाम होणार नाही, असं त्याला सांगण्यात आलं होतं, अशी माहिती संस्थेने दिली.
यानंतर विद्यार्थी हॉस्टेलच्या खोलीत गेला. काही वेळाने तो मृतावस्थेत आढळला. या घटनेची परिस्थिती आणि नेमकं काय घडलं, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.
या प्रकरणावर कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके यांनीही सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सरकारला जाब विचारला. “दूरवरच्या आदिवासी भागांपासून मुंबईसारख्या मोठ्या शहरापर्यंत विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न गंभीर होत आहे. हे संकट भौगोलिक सीमांच्या पलीकडचे आहे. दावा करत, विद्यार्थ्यांच्या आयुष्याला प्राधान्य देणार की नाही आणि आणखी किती विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागेल?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Students are dying in remote Tribal areas, and they’re dying in a cosmopolitan city like Mumbai too. This crisis cuts across geography. How many more students have to die before their lives become a priority? https://t.co/mNIsecU0ZC — Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) September 19, 2026
दरम्यान, विद्यार्थ्याच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांचा संताप पाहायला मिळाला. 400 हून अधिक विद्यार्थ्यांनी आंदोलन करत प्रशासनाकडे विविध मागण्या मांडल्या. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या मिड-सेमिस्टर परीक्षा स्थगित करण्यात आल्या.
दरम्यान, या प्रकरणावरून IIT प्रशासनाची भूमिका आणि विद्यार्थ्यांनी मांडलेले आरोप यामध्ये फरक असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी होऊन नेमकी परिस्थिती काय होती, हे स्पष्ट होणं महत्त्वाचं ठरणार आहे.






