सार्वजनिक वाहतूक दिनानिमित्त अॅक्वा लाईन प्रवाशांना भेट; बीकेसीत Cityflo ची मोफत फीडर बस सेवा
या विशेष उपक्रमामुळे बीकेसी मेट्रो स्थानकाच्या प्रवेश/निर्गमन द्वार A1 आणि A2 येथून प्रवाशांना बीकेसीमधील विविध महत्त्वाच्या ठिकाणी पूर्णपणे मोफत प्रवास करता येणार आहे. यामुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्या नागरिकांचा शेवटच्या टप्प्यातील प्रवास अधिक जलद, सोयीस्कर आणि अखंड होणार आहे.
Mumbai Metro : मुंबई मेट्रोमुळे दुग्धजन्य पदार्थांना मोठी बाजारपेठ; मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास
फीडर बसद्वारे जिओ वर्ल्ड प्लाझा, वन बीकेसी, जेटवन एमएमआरडीए, कलानगर, बीडीबी गेट क्रमांक ७, आयसीआयसीआय बस स्टॉप आणि क्रेसेन्झो यांसारख्या प्रमुख ठिकाणी विनामूल्य सेवा दिली जाणार आहे. बीकेसी परिसरात कामासाठी येणारे कर्मचारी, व्यावसायिक आणि नागरिक यांना या सेवेचा मोठा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.
मुंबईतील सर्वात महत्त्वाच्या व्यावसायिक आणि आर्थिक केंद्रांपैकी एक असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे दररोज हजारो नागरिक ये-जा करतात. अॅक्वा लाईन (मेट्रो मार्गिका-३) सुरू झाल्यापासून बीकेसीपर्यंतचा प्रवास अधिक वेगवान आणि आरामदायी झाला असून आता मोफत फीडर बस सेवेमुळे मेट्रो स्थानकापासून कार्यालये आणि इतर ठिकाणांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होणार आहे.
अॅक्वा लाईनमुळे आरे जेव्हीएलआर ते कफ परेड दरम्यान जलद प्रवास शक्य झाला असून मरोळ नाका (मेट्रो-१), सीएसएमटी, चर्चगेट, दादर, ग्रँट रोड, महालक्ष्मी आणि माहीम या उपनगरी रेल्वे स्थानकांशी महत्त्वाचे इंटरचेंज उपलब्ध झाले आहेत. तसेच पादचारी पुलाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-२ ला मेट्रो स्थानकाशी जोडण्यात आले आहे, त्यामुळे विमानतळापर्यंतचा प्रवासही अधिक सुलभ झाला आहे.
‘सार्वजनिक वाहतूक दिवस’ या उपक्रमामागील मुख्य उद्देश नागरिकांना एकात्मिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करण्यासाठी प्रोत्साहित करणे, रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करणे, कार्बन उत्सर्जनात घट घडवून आणणे आणि पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देणे हा आहे. या उपक्रमामुळे मेट्रो आणि फीडर बस यांचे प्रभावी एकत्रीकरण होऊन मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.






