
पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त लोढा यांच्याकडून बाणगंगेवर महाआरती
पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमात उपस्थित भाविकांनी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि देशसेवेच्या कार्याला बळ मिळावे, यासाठी प्रार्थना केली.
यावेळी बोलताना मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, ‘आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त बाणगंगा येथे महाआरती करून त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, यासाठी प्रार्थना केली. पंतप्रधान मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश विकासाच्या विविध क्षेत्रांत पुढे जात आहे. देशाच्या विकासाचा संकल्प आणि जनसेवेची भावना अधिक दृढ व्हावी, यासाठी आजच्या या पवित्र स्थळी प्रार्थना केली आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘आपल्या संस्कृतीत धार्मिक श्रद्धा आणि राष्ट्रसेवा यांना विशेष महत्त्व आहे. अशा मंगलमय प्रसंगी देशाच्या प्रगतीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करणे, ही आपल्या सर्वांची सामूहिक भावना आहे.’
महाआरतीदरम्यान बाणगंगा परिसरात भक्तिभावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित भाविकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच देशाच्या शांतता, समृद्धी आणि प्रगतीसाठी प्रार्थना करण्यात आली. कार्यक्रमाला स्थानिक नगरसेवक, नागरिक, कार्यकर्ते आणि भाविक उपस्थित होते. आज देशभरात अनेक ठिकाणी उत्साहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
सध्या सगळीकडे गणपतीच्या उत्सवाचे वातावरण आहे आणि दक्षिण मुंबईतील बाणगंगा हा परिसर विशेष धार्मिक परिसर म्हणून ओळखला जातो. या भागात उत्सवामुळे एक वेगळेच रूप प्राप्त होते. इथल्या भूमीला ऐतिहासिका वारसा लाभला असून या ठिकाणी अनेक मंदिरे आहेत आणि इथले पावित्र्य आजही तसंच राखून ठेवलं गेलं आहे. त्यामुळेच बाणगंगेवरील या महाआरतीलाही विशेष महत्त्व प्राप्त जालं आहे.