
फोटो सौजन्य सोशल मिडिया
Mumbai Central Railway : मुंबईच्या रेल्वे विभागाने रविवारी मुंबई, दि. 04 ऑक्टोबर 2026 रोजी मध्यरेल्वेच्या मेघा ब्लॉकदरम्यान ‘स्वच्छता रथा’ या उपक्रमातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते दादरदरम्यान तब्बल 1.68 लाख किलोंचा गाळ कचरा आणि टाकाऊ पदार्थ गोळा करण्यात आले आहेत. ‘स्वच्छता पंधरवडा’ आणि ‘विशेष मोहीम 6.0 ’ अंतर्गत मोहीम राबवण्यात आली होती. रेल्वे रुळांच्या बाजूला साचलेला गाळ आणि कचरा हटवण्यासाठी सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळे मध्ये विशेष ब्लॉक घेण्यात येतो. या दरम्यान सीएसएमटी, मशीद, परळ, दादर आणि माटुंगा या स्थानकांवर ही विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती.
रेल्वे मार्गालगतच्या कचरा साचणाऱ्या निश्चित ठिकाणांवरून गाळ, टाकाऊ पदार्थ आणि इतर अवशेष गोळा करून हटवण्यात आले होते. गोळा करण्यात आलेला 1.68 लाख किलोंचा कचरा सुमारे 28 हजार गोण्यांमध्ये भरून ‘स्वच्छता रथ’ या विशेष ईएमयू गाडीद्वारे वाहून नेण्यात आला होता. त्यानंतर हा कचरा अधिकृत स्वच्छता व्यवस्थेमार्फत प्रक्रिया आणि विल्हेवाट केंद्रांपर्यंत पोहोचवण्यात आला आहे.
या मोहिमेत ट्रॅकमन, स्वच्छता कर्मचारी, हाऊसकीपिंग पथके, पर्यवेक्षक आणि कंत्राटी कामगारांसह एकूण 881 कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. रेल्वे मार्गावरील कचरा तातडीने हटवावा आणि भविष्यात कचरा साचण्यास प्रतिबंध करणे व स्थानक परिसर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवणे यावर भर देण्यात आला.
रेल्व रुळांच्या बाजूला साचणारा गाळ आणि कचरा केवळ परिसराच्या स्वच्छतेवर परिणाम करत नाही, तर तो पाण्याचा निचरा करणाऱ्या वाहिन्यांना सुद्धा तुंबवू टाकतो. यामुळे पावसाळ्यात रेल्वे मार्गांवर पाणी साचण्याची समस्या जास्त होते. ही समस्या कमी करण्यासाठी मध्य रेल्वेकडून रविवारचा मेगा घेण्यात आला, ब्लॉकदरम्यान ‘स्वच्छता रथ’ किंवा ‘मक विशेष रेल्वे’च्या साहाय्याने गाळ आणि कचरा गोळा करून त्याची वाहतूक केली जाते.मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात एप्रिल ते सप्टेंबर 2026 या कालावधीत एकूण 1.91 लाख घनमीटर गाळ आणि कचरा साफ करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे
‘स्वच्छता पंधरवडा’, ‘स्वच्छता ही सेवा’ आणि ‘विशेष मोहीम 6.0 ’ या उपक्रमांच्या माध्यमातून रेल्वे मार्ग आणि स्थानक परिसर स्वच्छ ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रेल्वे मार्गांवर कचरा टाकू नये आणि परिसराचे प्रदूषण टाळावे, असे रेल्वे प्रशासनाने नागरिकांना आवहान केले आहे.