(फोटो सौजन्य: Pinterest)
पाचवी आणि सहावी मार्गिका सुरू झाल्यानंतर उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक स्वतंत्रपणे हाताळता येणार आहे. त्यामुळे गाड्यांच्या मार्गातील अडथळे कमी होऊन अतिरिक्त लोकल चालविण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होतील. बोरिवली-विरार पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामाचा भाग म्हणून बोरिवलीत एका नव्या फलाटाची उभारणी करण्यात येणार आहे. तसेच हार्बर मार्गाच्या विस्तारासाठी स्थानकाच्या दक्षिण बाजूस आणखी एक फलाट बांधण्यात येणार आहे. दोन्ही फलाटांची लांबी सुमारे ३३० मीटर आणि रुंदी सात मीटर असेल. विरारमध्येही पाचव्या आणि सहाव्या मार्गिकअंतर्गत अतिरिक्त फलाट उभारला जाणार आहे. नव्या फलाटामुळे पादचारी पुलांवरील गर्दी कमी होऊन जिन्यांवरील प्रवाशांचा ताणही कमी होण्याची अपेक्षा आहे.
पाचवी-सहाव्या मार्गिकेनंतर सेवाविस्तार
नवे फलाट आणि पाचवी-सहावी मार्गिका उपलब्ध झाल्यानंतर उपनगरीया सेवांची संख्या वाढविण्यास पश्चिम रेल्वेला अधिक वाव मिळणार आहे. कामे पूर्ण झाल्यानंतर परिचालनाच्या गरजांचा आढावा घेऊन विरारपर्यंतच्या अतिरिक्त सेवांचे। नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे सुमारे ३० ते ४० अतिरिक्त लोकल सुरू होण्याची शक्यता आहे.
अंधेरीत दोन टप्प्यांत विस्तार
दररोज सुमारे साडेचार लाख प्रवाशांची वर्दळ असलेल्या अंधेरी स्थानकावर एक हजारांहून अधिक उपनगरीय गाड्यांची ये-जा होते. त्यामुळे स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी दोन टप्प्यांत विस्तार करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात फलाट क्रमांक ४ आणि ५ दक्षिणेकडे वाढविण्याचे काम सुरू झाले आहे. यामुळे फलाट क्रमांक ५ वरून विरारच्या दिशेने गाड्या वळविणे अधिक सुलभ होणार आहे. फलाट क्रमांक ६ आणि ७ दक्षिणेकडे २० मीटर, तर उत्तरेकडे १० मीटरने वाढविण्यात येणार आहेत. सिग्नल एस-४९ दक्षिणेकडे हलविण्यात येणार आहे.
‘ॲक्वा लाईन’च्या वर्षपूर्तीनिमित्त खास भेट! टाइम कॅप्सूल आणि पासपोर्ट-शिक्का उपक्रम सुरू होणार
अंधेरीतील फलाट ९वरील गर्दीला लगाम
दुसऱ्या टप्प्यात सहाव्या मार्गिकेला लागून स्थानकाच्या उत्तरेकडील बाजूस १२ डब्याचा नवा होम फलाट उभारण्यात येणार आहे. या फलाटावर दोन्ही बाजूंनी प्रवाशांना बाहेर पडता येणार आहे. त्यामुळे फलाट क्रमांक ९ वर येणाऱ्या प्रवाशांना अंधेरी पूर्वेकडील रस्त्याच्या दिशेनेही थेट बाहेर पडता येईल, सध्या फलाट क्रमांक ९ वर गाडी आल्यानंतर प्रवाशांना प्रामुख्याने पादचारी पूल आणि अरुंद जिन्यांचा वापर करावा लागतो. त्यामुळे गर्दीच्या वेळेत मोठी कोडी होते.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






