
Mumbai FDA Action : पुन्हा मुंडेंच्या FDA चा दणका! चेतना, कॅफे आयडियल, नॅचरल्ससह दक्षिण मुंबईतील 9 हॉटेल्सचे परवाने निलंबित
Mumbai FDA Action : मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल्स अन् रेस्टॉरंट्ससह राज्यातील खाद्य व्यवसायांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. मागील काही दिवसांपासून तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्त्वात FDA ने सुरू केलेल्या धडक कारवाईने वेग घेतला असून नागरिकांच्या आरोग्याला अपायकारक ठरणाऱ्या घटकांना त्याचा फटका बसत आहे.
दरम्यान, प्रसिद्ध असे चेतना रेस्टॉरंट असो, कॅफे आयडियल असो, बेयरूट असो अथवा चर्चगेट येथील नॅचरल आइसक्रीम यांच्यासह दक्षिण मुंबईतील 9 रेस्टॉरंटचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आल्याचे समोर आले आहे. याशिवाय ठाण्यातील 3 खाद्य आस्थापनांवरही कारवाई करण्यात आली. अन्नपदार्थ तयार करण्याच्या ठिकाणी अस्वच्छता, अन्नसाठवणुकीतील त्रुटी आणि कीटकांचा प्रादुर्भाव आढळल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे FDA ने स्पष्ट केले.
18 नोव्हेंबर रोजी FDA प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, 17 नोव्हेंबरला विविध ठिकाणी तपासणी करण्यात आली. या तपासणीत अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे आढळून आले. अन्न तयार करण्याच्या जागेतील अस्वच्छता, अन्नपदार्थ योग्य तापमानात न ठेवणे, कीटकांचा प्रादुर्भाव तसेच आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांचा अभाव अशा त्रुटी निदर्शनास आल्या आहेत.
कोलाबा येथील कॅफे आयडियलमध्ये खाद्यपदार्थ तयार करण्याच्या जागेजवळ ओल्या कचऱ्याच्या पिशव्या भरून वाहत असल्याचे आढळले. तसेच उघड्या विद्युत तारा, भांडी धुण्याच्या ठिकाणी गरम पाण्याची सुविधा नसणे आणि कच्चे व शिजवलेले मांसाहारी पदार्थ एकत्र उघड्यावर ठेवण्यात आल्याचे तपासणीत समोर आल्याचे FDAने आपल्या निवेदनात सांगितले आहे.
तसेच काळा घोडा येथील चेतना रेस्टॉरंटमध्ये अन्नपदार्थांसाठी अयोग्य कंटेनर वापरणे, रेफ्रिजरेटरचे खराब झालेले रबर, तुटलेल्या फरशा, बुरशी आणि जमिनीवर सांडणारे सांडपाणी अशा त्रुटी आढळल्या.
तर फोर्ट येथील मियाँ कबाब्समध्ये मेन्यू कार्डवर जिवंत झुरळ, परिसरात माशा आणि कच्चे चिकन 13 अंश सेल्सिअस तापमानात साठवून ठेवल्याचे आढळले. नियमांनुसार कच्चे चिकन 4 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमानात ठेवणे आवश्यक असते.
कफ परेड येथील बेयरूटमध्ये उंदरांचा वावर, खिडक्यांना जाळ्या नसल्यामुळे आत येणाऱ्या माशा, अस्वच्छ रेफ्रिजरेशन व्यवस्था आणि भांडी ठेवण्याच्या रॅकखाली उघडी गटारव्यवस्था आढळल्याचे FDA ने म्हटले आहे.
तसेच चर्चगेट येथील नॅचरल आइसक्रीममध्ये अस्वच्छ फ्रीजरमध्ये उघडे आइस्क्रीम ठेवण्यात आले होते. काउंटरवरील उत्पादनांवर उत्पादन तारीख आणि एक्सपायरी डेटची लेबले नव्हती. तसेच परिसरात धूळ आणि माशा ही आढळल्या.
या 9 खाद्य पदार्थ्यांच्या दुकानांमध्ये दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध असे चेतना रेस्टॉरंट, कॅफे आयडियल, बेयरूट, मियाँ कबाब्स, नॅचरल आइसक्रीम, श्रीयोग रेस्टॉरंट, गुप्ता फ्रूट ज्यूस सेंटर, प्रकाश डोसा आणि सौरभ हॉटेल्स यांचा समावेश आहे.
ठाण्यातील ब्लिंक कॉमर्स प्रा. लि., ब्रोडयामा फूड्स एलएलपी आणि सागर स्वीट अँड बेकरी या तीन आस्थापनांचेही परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
दुसरीकडे, परवाने निलंबित असलेल्या दक्षिण मुंबईतील नऊ आस्थापनांना खाद्यपदार्थांची खरेदी, विक्री किंवा वितरण करण्यास मनाई करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही FDA ने दिला आहे.
पुण्यात सहा खाद्य विक्रेत्यांचे व्यवसाय बंद
पुण्यातील सिंहगड रोडवरील माणिकबाग खाऊ गल्लीमधील सहा खाद्य विक्रेत्यांकडे वैध FSSAI परवाना किंवा नोंदणी नसल्याचे आढळल्याने त्यांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये नीलंका राइस सेंटर, पुणेरी अंडा भुर्जी सेंटर, वृंदावन दाल खिचडी, अमृत वडेवाले, ओम साई राम टी सेंटर कॉर्नर आणि नॅचरल फ्रेश ज्यूस सेंटर यांचा समावेश आहे.
FDA ने यावेळी राज्यभरातील कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या साठ्याची माहिती दिली. या राज्यव्यापी कारवाईत पुणे जिल्ह्यातील मावळ येथे एव्हेन्यू सुपरमार्ट्सच्या ठिकाणाहून 50.27 लाख रुपये किमतीचे 20 हजार 85 लिटर खाद्यतेल जप्त करण्यात आले. हे तेल निकृष्ट दर्जाचे आणि चुकीच्या लेबलिंगचे असल्याचा FDA चा दावा आहे.
नागपूरमध्ये सुपारी भाजण्याच्या दोन युनिटवर छापे टाकून 75.19 लाख रुपये किमतीची 25 हजार 357 किलो सुपारी जप्त करण्यात आली. अकलूज येथील Mateshwari Caterers कडूनही कालबाह्य किंवा अस्वच्छ स्थितीत साठवलेले तूप, गव्हाचे पीठ, बेसन आणि शेव असा 144 किलो खाद्यसाठा जप्त करण्यात आला.
गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखू यांसारख्या प्रतिबंधित पदार्थांविरोधातही FDA ने कारवाई केली. राज्यभरात 1.68 लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबईतील बोरिवली येथील गणेश पान बिडी शॉपमधून 8 हजार 728 रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कालबाह्य किंवा भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत किंवा गैरप्रकारांबाबत ग्राहकांना 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर किंवा complaints.mahafda.in या पोर्टलवर तक्रार करता येणार आहे.
Ans: महाराष्ट्र FDA ने राज्यातील एकूण 12 खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत. यामध्ये दक्षिण मुंबईतील नऊ रेस्टॉरंट्स आणि ठाण्यातील तीन आस्थापनांचा समावेश आहे.
Ans: चेतना रेस्टॉरंट, कॅफे आयडियल, बेयरूट, मियाँ कबाब्स आणि नॅचरल आइसक्रीम यांच्यासह नऊ आस्थापनांवर कारवाई झाली आहे.
Ans: तपासणीत अस्वच्छ अन्न तयार करण्याची ठिकाणे, अयोग्य अन्नसाठवणूक, झुरळे-माशा-उंदरांचा प्रादुर्भाव आणि आवश्यक कागदपत्रांचा अभाव अशा त्रुटी आढळल्या.