लालबागच्या राजाच्या प्रवेशद्वाराजवर मोठा अपघात, भरधाव वाहनानं दोन चिमुकल्यांना चिरडलं, 2 वर्षीय चिमकुलीचा मृत्यू तर एक जखमी (फोटो सौजन्य-X)
Mumbai Lalbaugcha Raja Accident News In Marathi : आज गणेशोत्सवाच्या दहा दिवसाच्या बाप्पााला निरोप देण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत. आज सकाळपासूनच मुंबईसह राज्यभरात विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली असून ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषणांनी वातावरण दुमदुमलं आहे. अशातच मुंबईच्या लालबागचा राजा येथून धक्कादायक घटना घडली.
लालबागच्या राजाला पाहण्यासाठी नेहमीच लाखोंची गर्दी जमते. यावेळीही दृश्य असेच होते – ढोल-ताशांचा आवाज, गुलालाचा पाऊस आणि भाविकांची प्रचंड गर्दी. पण त्याच दरम्यान एक घटना घडली ज्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी लालबागच्या राजा येथील मुख्य प्रवेशद्वारासमोर हा अपघात झाला. एका अज्ञात वाहनाने दोन मुलांना धडक दिली. दोघेही गंभीररित्या चिरडले गेले. या अपघातात एका दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. तिच्या ११ वर्षांच्या भावाला गंभीर दुखापत झाली आहे आणि त्याला परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हृदयद्रावक गोष्ट अशी होती की अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पळून गेला. चिमुकल्यांना मदत न करता रस्त्यावर सोडून तो पळून गेला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. हा अपघात निष्काळजीपणामुळे झाला आहे की इतर काही कारणांमुळे झाला आहे याचाही तपास सुरू आहे.
गणेश विसर्जनादरम्यान मुंबई पोलीस आधीच सतर्क आहेत. विविध ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मिरवणूक सुरळीत पार पडावी म्हणून वाहतूक वळवण्यात आली आहे. पण इतक्या बंदोबस्तातही ही दुर्दैवी दुर्घटना घडली.