
मुंबईकरांनो, लोकलचं सध्याचं स्टेटस काय? सिग्नल बिघाड, प्रवाशांचा खोळंबा; जाणून घ्या ताज्या अपडेट
Mumbai Local Train: मुंबईकरांच्या आठवड्याच्या सुरुवातीलाच मध्य रेल्वेवरील लोकल वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. ठाणे-मुलुंडदरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने आणि कांजूरमार्ग येथील रेल्वेच्या रिले रूममध्ये आग लागल्याने मुंबईच्या दिशेने येणारी लोकल वाहतूक विस्कळीत झाली. एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. काही लोकल गाड्या दीर्घकाळ खोळंबल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले.
ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायरवर काहीतरी वस्तू पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकल वाहतुकीवर परिणाम झाला. या बिघाडामुळे काही काळ रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती.रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्तीची कार्यवाही केली.
ओव्हरहेड वायरच्या बिघाडासोबतच कांजूरमार्ग रेल्वे स्थानकातील लोकल सेवा नियंत्रित करणाऱ्या रिले रूममध्ये सकाळी साडेनऊच्या सुमारास सौम्य स्वरूपाची आग लागल्याची माहिती समोर आली. या घटनेचा परिणाम रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेवर झाला. सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने लोकल गाड्यांच्या संचालनात अडथळे निर्माण झाले. परिणामी, गाड्या जागच्या जागी थांबल्या आणि मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मागील लोकल गाड्यांवरही परिणाम झाला. या दोन घटनांमुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले.
लोकल सेवा विस्कळीत झाल्याने अनेक प्रवाशांना गाड्यांमध्येच दीर्घकाळ थांबावे लागले. कामावर वेळेत पोहोचण्याची घाई असलेल्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. काही प्रवाशांनी गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी रेल्वे रुळांवर उतरून पायी जाण्याचा पर्याय निवडल्याचे पाहायला मिळत आहे. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे केवळ संबंधित स्थानकांवरीलच नव्हे, तर पुढील मार्गांवरील लोकलच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला.
ठाणे-मुलुंडदरम्यानचा ओव्हरहेड वायरचा बिघाड दूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, कांजूरमार्ग येथील सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त करण्यासाठी अधिक वेळ लागत असल्याची माहिती देण्यात आली. दुपारी ४ ते ५ वाजेपर्यंत जलद मार्गावरील सिग्नल यंत्रणा सुरू करण्याचे रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न होते. तर धीम्या मार्गावरील सेवा रात्रीपर्यंत पूर्ववत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.
सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक बिघाड आणि त्याच्या दुरुस्तीमुळे लोकल गाड्यांचे वेळापत्रक पूर्ववत होण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे संध्याकाळी कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांनाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
कसाराच्या दिशेने जाणारी लोकल ट्रेन विक्रोळीमध्ये थांबली आहे. लोकल ट्रेनमधून प्रवासी उतरुन ट्रॅकवरून चालत आहेत. लागोपाट लोकलच्या रांगा लागल्याने ट्रेनची बंचिंग झाली आहे. लोकल ट्रेनच्या मागे ट्रेन लाईनीत उभ्या झालेल्या दिसत आहेत. प्रवासी जीव धोक्यात घालून ट्रॅक वरून प्रवास करीत आहेत.महिला प्रवासी तरुणी यांना ट्रेनमधून उतरण्यासाठी लोक मदत करताना दिसत आहेत. काही जण घाटकोपरवरून ट्रॅकवरून चालत आले आहेत. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
Ans: ठाणे-मुलुंडदरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड आणि कांजूरमार्ग येथील रिले रूममध्ये आग लागल्याने सिग्नल यंत्रणेवर परिणाम झाला. त्यामुळे लोकल वाहतूक विस्कळीत झाली.
Ans: जलद मार्गावरील सिग्नल दुपारी ४ ते ५ वाजेपर्यंत सुरू करण्याचे प्रयत्न होते, तर धीम्या मार्गावरील सेवा रात्रीपर्यंत पूर्ववत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. प्रत्यक्ष स्थितीची अधिकृत पुष्टी आवश्यक आहे.
Ans: अनेक लोकल गाड्या खोळंबल्या, प्रवाशांना गाड्यांमध्ये दीर्घकाळ थांबावे लागले आणि कामावर जाणाऱ्या तसेच परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली.