
फोटो सौजन्य AI
पण ट्रम्प यांनी मागचे पाढे पंचावन्न केले इराणसोबत युद्ध सुरु केले यामुळे त्यांची अमेरिकेतील लोकप्रियता ढासळली , ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेत मोर्चे निघाले आणि शेवटी अमेरिकेच्या जनतेने मतदानातून आपला राग व्यक्त करत ट्रम्प यांना आणि त्यांच्या सारख्या विचारधारेच्या लोकांना स्पष्ट संदेश दिला कि आता तुमची मनमानी चालणार नाही .
अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाने मोठे यश मिळवत काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांवर नियंत्रण मिळवले, तर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला मोठा धक्का बसला. या पराभवामागे इराण युद्धाचाही वाटा असल्याचे स्वतः ट्रम्प यांनी मान्य केले आहे. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी, “मला वाटते, यामागील एक कारण इराण होते,” अशी प्रतिक्रिया दिली.
US Midterms : ट्रम्प यांच्या पराभवाचा भारताला फायदा की तोटा? व्यापार, व्हिसा अन् काश्मीरवरून नवा पेच
फॉक्स न्यूजशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन पक्षाच्या पराभवामागील कारणांवर भाष्य केले. इराणमधील युद्धाचा निवडणुकीवर परिणाम झाला का, या प्रश्नावर त्यांनी त्याला दुजोरा दिला. “मला वाटते की याचे एक कारण इराण हे होते,” असे ट्रम्प म्हणाले. युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि त्याचा अमेरिकेतील मतदारांवर झालेला परिणाम रिपब्लिकन पक्षासाठी अडचणीचा ठरल्याचे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले.
मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाने प्रतिनिधीगृह आणि सिनेट या दोन्ही सभागृहांमध्ये विजय मिळवत रिपब्लिकन पक्षाला सत्तेपासून दूर केले. या निकालामुळे ट्रम्प प्रशासनासमोर आता संसदेतील विरोध अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. आगामी काळात सरकारच्या निर्णयांवर देखरेख, युद्धासंबंधी धोरणे आणि आर्थिक विषयांवर डेमोक्रॅट्सकडून प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. त्यामुळे ट्रम्प यांच्या उर्वरित कार्यकाळातील राजकीय आव्हाने वाढणार आहेत.
इराण युद्धामुळे अमेरिकेत इंधनाच्या किमती वाढल्या आणि महागाईचा दबाव निर्माण झाला. याचा थेट परिणाम सर्वसामान्य अमेरिकन नागरिकांच्या दैनंदिन खर्चावर झाला. युद्धाबाबतची नाराजी आणि वाढत्या जीवनावश्यक खर्चाचा मुद्दा निवडणुकीत महत्त्वाचा ठरला. त्यामुळे मतदारांनी रिपब्लिकन पक्षाविरोधात मतदान केल्याचे विश्लेषण केले जात आहे. ट्रम्प यांनी इराण युद्धाचा निवडणुकीतील पराभवाशी संबंध मान्य केल्याने त्यांच्या परराष्ट्र धोरणावरही नव्याने चर्चा सुरू झाली आहे.