महिलेने गिळल्या ११ कोटींच्या कॅप्सूल; पोलीसही चक्रावले, मुंबई एअरपोर्टवर मोठी कारवाई
मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर महसूल गुप्तचर संचालनालय म्हणजेच डीआरआयने मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी एका ब्राझिलच्या महिलेला अटक केली आहे. या महिलेकडून पोलिसांनी तब्बल ११ कोटी रुपयांचं कोकेन जप्त केले आहे. कोकेनची तस्करी करण्याचा या महिलेचा प्रयत्न मुंबई एअरपोर्टवर पोहचताच पोलिसांनी उधळवून लावला. या महिलेने हे कोकेन ज्या पद्धतीने भारतामध्ये आणण्याचा प्रयत्न केला ते ऐकून पोलिसही हादरले.
मुंबईमध्ये ड्रग्जची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या ब्राझिलियन महिलेला पोलिसांनी अटक केली. ही महिला मुंबई एअरपोर्टवर दाखल झाली. तेव्हा ती सतत पोटाला हात लावत होती. त्यामुळे पोलिसांनी तिची विचारपूस केली. यावेळी या महिलेची चौकशी केली असता जी माहिती समोर आली ते ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. या महिलेने कोकेनच्या तब्बल १०० कॅप्सूल गिळल्या होत्या. पण तिचा मुंबईत कोकेन आणण्याचा प्रयत्न फसला. तिने मुंबईत आणलेल्या या कोकेनची किंमत १०.९६ कोटी रूपये इतकी आहे.
डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, साओ पाउलोहून मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर आलेल्या महिलेला अटक केली. या महिलेच्या चौकशीनंतर तिने भारतात तस्करी करण्यासाठी कोकेन कॅप्सूल गिळल्याची कबुली दिली. त्यानंतर या महिलेला जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तिच्या शरीरातून १,०९६ ग्रॅम कोकेन असलेले सुमारे १०० कॅप्सूल जप्त करण्यात आले. या कोकेनची किंमत १०.९६ कोटी रुपये आहे.
एनडीपीएस कायद्यांतर्गत हे कोकेन जप्त करण्यात आले आणि त्यानंतर महिलेला अटक करण्यात आली. केंद्रीय एजन्सीने तिच्यावर अनेक आरोप लावले आहेत. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी करणे याचा समावेश आहे. या आरोपासाठी या महिलेला २० वर्षांची शिक्षा होऊ शकते.
राज्यात लाच घेतल्याचे अनेक प्रकरण उघडकीस आले आहेत. अशातचं आता इंदापुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. इंदापूर तहसील कार्यालय येथे महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या कावेरी विजय खाडे यांना शेतकऱ्याकडून २५ हजाराची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. तसेचं त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रेम वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार इंदापूर तालुक्यातील तक्रारदार यांच्या वडिलांची ३९ गुंठे जमीन आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्याबाबत सन २०२० पासून तहसीलदार यांच्याकडे दावा सुरू आहे. याबाबत तहसीलदार इंदापूर यांची सुनावणी होऊन निकाल देणे बाबतची प्रक्रिया बाकी होती. सदर निकालाची कागदपत्रे तक्रारदाराच्या बाजूने तयार करून द्यावे म्हणून कावेरी विजय खाडे (वय-४८ वर्षे) महसूल सहाय्यक वर्ग ३ तहसील कार्यालय इंदापूर, रा. संघवीनगर, भिगवन रोड, बारामती) यांनी ५० हजार रुपयाची लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती २५ हजार रुपये देण्याचे ठरले.