
‘तुम्हीच आरोपींना फरार होण्याची संधी दिली’;रुग्णालयातील मारहाण प्रकरणी हायकोर्ट संतप्त, पोलिसांच्या दिरंगाईवर हायकोर्टाचे ताशेरे
Pune Metro Line 3: हिंजवडीकरांची प्रतीक्षा संपणार! पुणे मेट्रो लाईन ३ ची तारीख लवकरच जाहीर होणार
हे एक गंभीर प्रकरण आहे, एका रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर हल्ला होतो अशा संवेदनशील प्रकरणात पोलिसांनी कोणताही तपास केलेला नाही, हे अस्वीकारार्ह असल्याचे निरीक्षण न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठाने नोंदवले. डोंबिवलीस्थित महापालिका रुग्णालयात शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी डॉक्टरांवर केलेल्या हल्ल्याचे प्रकरण ताजे असताना त्या घटनेतून पालघर पोलिसांनी काहीही धडा घेतला नाही, असे खडेबोलही न्यायालयाने सुनावले. तसेच, ठाणे जिल्ह्यातील प्रकरणाची न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. आता पालघर जिल्ह्यासाठी नव्याने स्वतः हून याचिका दाखल करू? ठाणे जिल्ह्यात घडलेली घटना पुरेशी नव्हती का ? ठाणे प्रकरणातून पोलिसांनी कोणताही घडा घेतला नाही का? अशी प्रश्नांची सरबत्ती न्यायालयाने केली. पालघर पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्यात रस नसल्यास तसे सांगावे आम्ही प्रकरण मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपवू, असा इशाराही न्यायालयाने दिला.
केस डायरीवरून फटकारले
पोलिसांनी ‘प्रकरण नोंदवही (केस डायरी) योग्य पद्धतीने न ठेवण्यावरूनही न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढले. आम्ही वेळोवेळी या संदर्भात आदेश दिले आहेत, त्यावर पोलिस महासंचालकांनी केस डायरी नियमित ठेवण्याचे आदेश दिले असतानाही पोलिस त्याच्याच वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहे, असेही न्यायालयाने सुनावले, तसेच, संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली जाईल, याविषयी पोलीस महासंचालकांशी चर्चा करण्याचे आदेश दिले. त्यावर, पोलीस महासंचालक पालघर पोलिसांकडून सर्व कागदपत्रे मागवून घेतली असून त्याचा अभ्यास करून योग्य ती कारवाई करतील, असे वकिलांनी न्यायालयाला सांगितले.
तुम्ही गंभीर नाही
डोंबिवली प्रकरणात न्यायालयाच्या आधीच्या आदेशांचे पालन केल्याचे दर्शवणारे प्रतिज्ञापत्र सरकारी वकिलांनी यावेळी सादर केले. तसेच, रमेश म्हात्रे याच्यासह अन्य आरोपींवर आरोपपत्र दाखल केल्याचेही सांगण्यात आले. परंतु, मागील आदेशांची योग्य पूर्तता न केल्यावरून न्यायालयाने पोलिसांना फटकारले. तसेच, तुम्ही या प्रकरणाबाबत खरेच गंभीर आहात का ? असा संतप्त प्रश्न केला.
Mumbai Crime: आधी घराचे भाडे भरले, नंतर अचानक गायब; १९ जणांची कोट्यवधींची फसवणूक
आरोपींची ओळख पटली असतानाही शोध का नाही?
प्राथमिक माहिती अहवालामध्ये नाव असलेल्या दहा जणांपैकी शिवसेनेचा शहर प्रमुख राहुल धरत अटकेत असून, तो पोलिस कोठडीत आहे. उर्वरित नऊ आरोपी फरारी असून सात निनावी व्यक्तीविरोधात तक्रार करण्यात आल्याची माहिती पालघरचे पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी न्यायालयाला दिली. गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीना अटक करण्यासाठी पोलिसांनी तातडीने का कारवाई केली नाही? फरारी असलेल्या नऊ आरोपींची ओळख पटलेली असताना त्यांचा शोध का घेतला नाही? गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्परतेने तपास झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे, पोलिसांच्या निष्काळजीपणामुळेच आरोपी फरारी झाले असून तुम्हीच त्यांना फरारी होण्याची संधी दिल्याचे खडेबोलही न्यायालयाने सुनावले.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)