
कबुतरखान्यांवरून पुन्हा ‘फडफड’; निलेशचंद्र विरुद्ध मराठी एकीकरण समिती आमनेसामने
विजय काते, मिरा भाईंदर : मुंबईतील बंद असलेल्या कबुतरखान्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कबुतरखाने तातडीने सुरू करण्यात यावेत, अशी मागणी करत जैन मुनी निलेशचंद्र महाराज यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. कबुतरखाने सुरू न झाल्यास आंदोलनासह आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिल्याने या विषयावरून पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.(Kabutarkhana Controversy)
मुंबईतील कबुतरखान्यांबाबत गेल्या काही महिन्यांपासून धार्मिक आस्था आणि सार्वजनिक आरोग्य यांच्यात संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे कारण देत मुंबईतील अनेक कबुतरखाने बंद करण्यात आले आहेत. तसेच संबंधित ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. मुंबईतील सुमारे ५१ कबुतरखाने अद्याप बंद असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कबुतरखाने बंद ठेवण्याच्या शासनाच्या निर्णयाला मराठी एकीकरण समितीने पाठिंबा दर्शविला आहे. कबुतरांना मोठ्या प्रमाणात दाणे टाकल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी म्हटले आहे. कबुतरखाने पूर्णपणे बंद करण्याऐवजी संबंधित ठिकाणी कठोर नियम लागू करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. “कबुतरांना नैसर्गिक अन्न मिळू द्या. दाणे टाकून त्यांना परावलंबी आणि अधू करू नका,” असे देशमुख यांनी म्हटले.
कबुतरखाने सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा देणाऱ्या जैन मुनी निलेशचंद्र यांच्या भूमिकेवरही गोवर्धन देशमुख यांनी तीव्र शब्दांत टीका केली. निलेशचंद्र हे महाराष्ट्रातील मूळ प्रश्नांपासून नागरिकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच सरकारला धमकी देण्याची भाषा सहन केली जाणार नाही, अशी भूमिकाही देशमुख यांनी व्यक्त केली.
दरम्यान, कबुतरखान्यांबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाची कठोर अंमलबजावणी करावी, दाणे टाकणाऱ्यांवरील दंड वाढवावा आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी मराठी एकीकरण समितीने केली आहे. कबुतरखाने सुरू करण्याच्या मागणीवरून जैन मुनी निलेशचंद्र यांनी दिलेला आंदोलनाचा इशारा आणि त्याला मराठी एकीकरण समितीने केलेला विरोध यामुळे मुंबईतील कबुतरखान्यांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
फक्त १ इंचाचा गणराया! कुर्ल्यात शेषनागाच्या फण्याखाली ‘लिटिल मास्टर’चे दर्शन