
शिक्षकांची रवानगी निवडणूक कामासाठी (Photo Credit - X)
Mumbai Municipal Teacher BLO Duty: दिवाळी सुट्टीनंतर मुंबई महानगरपालिकेच्या शाळा सुरू होताच पालिका शाळांतील सर्व भाषिक शेकडो शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी एल ओ) व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक (बीएलओ सुपरवायझर) या कामासाठी नियुक्त केल्याबाबत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून आदेश आले आहेत. आदेशात मतदार यादी अद्यावत करणे कामी नियुक्त कर्मचारी यांनी निवडणूक कार्यालयात पूर्णवेळ उपस्थित राहावे असे म्हटले आहे.
शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण?
पालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई शहर व उपनगर यांच्या आदेशानुसार शिक्षकांनी पूर्णवेळ शाळेत थांबून त्यानंतर हे काम करावे असे म्हटले आहे. त्यामुळे पालिका प्रशासन आणि आयोग यांच्या या परस्पर विरोधी भूमिकेच्या कचाट्यात शिक्षक सापडले असून नेमका कोणाचा आदेश पाळायचा याबाबत शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
४०० शिक्षकांची केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्ती
मुंबई शहर विभागात ४०० शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आली आहेत. सन २००२ च्या अंतिम मतदार यादींची व त्यानंतर आजपर्यंत (सन २०२४) समाविष्ट वगळणी झालेल्या मतदार यांची सन २००२ च्या मतदार यादीच्या पडताळणी झालेल्या मतदार यादीची ‘पार्ट मॅपिंग’ करणे तसेच वय वर्ष १०० वरील मतदाराची पडताळणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी एल ओ) यांच्यामार्फत करण्यात यावे असे मुख्य निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर यांच्या आदेशान्वये प्रत्यक्ष घरोघरी जाऊन क्षेत्र पडताळणी करून त्याबाबतचा अहवाल मुख्य कार्यालयाकडे सादर करावयाचा आहे. त्यासाठी पालिका शाळांतील शिक्षकांच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक म्हणून नेमणुका करण्यात आल्या असून तसे आदेश शिक्षकांना पाठवण्यात आले आहेत.
हे देखील वाचा: BMC Election Reservation : मुंबईतील 227 प्रभागांसाठी आरक्षण सोडत जाहीर; तुमच्या प्रभागातील आरक्षण कोणतं? वाचा संपूर्ण यादी
निवडणूक कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक
शिक्षकांना जिल्हाधिकारी याच्या अखत्यारीतील निवडणूक कार्यालयातून पाठवलेल्या कार्यालयीन आदेशामध्ये यादी अद्ययावत करणे कामी नियुक्त कर्मचारी यांनी निवडणूक कार्यालयात पूर्ण वेळ उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. तसेच सदरचा आदेश आपल्या कार्यालय प्रमुख यांना दाखवून १० नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर पर्यंत निवडणूक कार्यालयात पूर्णवेळ हजर राहावयाचे आहे असे स्पष्ट नमूद करण्यात आली आहे.
राज्य प्रशासन, आयोगाच्या कचाट्यात अडकला शिक्षक
दुसरीकडे मात्र मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई शहर व उपनगर यांनी १२ जून २०२५ रोजी काढलेल्या आदेशामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नेमणुका झालेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त न करता ते पूर्णवेळ कार्यालयात हजर राहून कार्यालयीन कामकाजासह निवडणुकीचे कामकाज करतील असे म्हटले आहे. त्यामुळे शिक्षण विभागातील अधिकारी पालिका आयुक्तांच्या या आदेशाकडे बोट दाखवत,’ शिक्षकांनी पूर्ण वेळ शालेय कामकाज पार पाडून नंतरच निवडणुकीचे काम करावे’ असे सांगत आहेत त्यामुळे पालिका प्रशासन आणि निवडणूक आयोग यांच्या या परस्परविरोधी आदेशाच्या कचाट्यात पालिका शिक्षक सापडले असून नेमके आदेश तरी कोणाचे पाळायचे आणि काम तरी कसे करायचे असा यक्ष प्रश्न शिक्षकांसमोर आ वासून उभा आहे.