
मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! 'या' उपविभाग प्रमुखाने हाती घेतले 'कमळ' (photo Credit- X)
अशोक मिश्रा हे अंधेरी पूर्वमधील शिवसेनेचे उपविभाग प्रमुख होते. त्यांनी २०१४ साली शिवसेनेत प्रवेश केला होता. अशोक मिश्रा यांनी २०१४ विधानसभा निवडणूक, लोकसभा निवडणूक, २०१७ बीएमसी निवडणूक, २०१९ लोकसभा व विधानसभा निवडणूक तसेच २०२४ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी जोमाने काम केले. त्यांनी आमदार रमेश लटके, त्यांची पत्नी ऋतुजा लटके आणि खासदार गजानन कीर्तिकर यांच्या विजयासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली.
अंधेरी आणि जोगेश्वरी परिसरात पक्षाचा प्रभाव वाढवणे, उत्तर भारतीय मतदारांना पक्षाशी जोडणे, मराठी मतदारांमध्ये विश्वास निर्माण करणे, मराठी युवकांची स्वतंत्र टीम उभारणे, तसेच सांस्कृतिक, धार्मिक व क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन करणे हे सर्व काम त्यांनी केले. मात्र तिकीट देण्याची वेळ आली तेव्हा पक्षाने त्यांच्या वर्षानुवर्षांच्या मेहनतीकडे दुर्लक्ष केले.
अशोक मिश्रा यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात १९९९ साली संजय निरुपम यांच्या सोबत केली होती. तरुण आणि जुझारू नेता म्हणून त्यांनी अंधेरी जोगेश्वरी परिसरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. भारतीय जनता पार्टीत प्रवेश करताना अंधेरीचे आमदार मुरजी पटेल हेही अशोक मिश्रा यांच्यासोबत उपस्थित होते. अशोक मिश्रा यांना भाजपात सामील करून घेण्यात मुरजी पटेल यांची महत्त्वाची भूमिका असल्याची चर्चा आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, यामुळे अंधेरीतील मुरजी पटेल यांची ताकद आणखी वाढेल, तर अशोक मिश्रा यांना नव्या पक्षात नव्या उर्जेसह काम करण्याची संधी मिळेल.
बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा घडामोडीचा क्रम यूबीटी शिवसेनेसाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे, तर भाजपासाठी मुंबईत आपली पकड मजबूत करण्याची संधी म्हणून पाहिले जात आहे.