दक्षिण आणि दक्षिण मध्य मुंबईमध्ये कोणाचा राहणार वरचश्मा? भाजपा आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांचे मुसंडी मारायचे प्लॅनिंग
दक्षिण मुंबई हा भाग संमिश्र असा आहे. कुलाबा, मलबारहिल, कफ परेड असा धनाढ्य लोकांचा भाग आहे, तर दुसरीकडे परळ, लालबाग, शिवडी, भायखळा असा मध्यमवर्गीय भाग आहे. दादर शिवाजी पार्क येथे उच्च मध्यमवर्गीयांची वस्ती आहे, तर धारावी ही आशियातील मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाते. या भागात मोठ्या प्रमाणात सेस इमारतींचे पुनर्वसनाचे प्रश्न आहेत.
राज्यात सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पिछेहाट होत असली तरी मुंबईच्या या भागाने उदधव ठाकरेंना विधानसभेत हात दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडानंतर राज्यात अनेक ठिकाणी दमदार कामगिरी केलेली असली तरी या भागातील रस्त्यावरचा शिवसैनिक अदयाप तरी म्हणावा तितका त्यांच्यासोबत वळविण्यात त्यांना यश आलेले दिसत नाही, तो बऱ्याचशा प्रमाणात अद्यापही उद्धव ठाकरेंसोबत आहे. भाजपा हा मराठी तसेच अमराठी मतदारांवर विसंबून असणार आहे. राज ठाकरे यांचा मनसे फॅक्टर सोबत असल्याने उद्धव ठाकरे यांना मोठी मदत होणार आहे. महापालिकेला विजयाचे मार्जिन पावशे-हजार मतांच्या आसपास असू शकेल.
त्यामुळे एकत्र आलेल्या ठाकरे ब्रेडला टफ देण्यासाठी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांना वेगळी रणनीती या भागासाठी आखावी लागणार आहे. लोकसभा आणि विधानसभेत या भागातील मुस्लिम मतदारांनी उदधव ठाकरेच्या उमेदवारांना बऱ्यापैकी साथ दिली होती, पण महापालिकेत काँग्रेस वेगळी लढणार आहे. त्यामुळे मुस्लिम मतांचे विभाजन महायुतीच्या पथ्यावर पडू शकते. अटलसेतु, मेट्रो मोनो आदी विकासकामे भाजपाला सोयीची ठरू शकतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांत प्रचार हा विकासाच्या मुददयावर केंद्रित ठेवला होता. ठाकरे बंधूच्या मराठी आदी भावनिक मुख्यांना मुख्यमंत्री फडणवीस मुंबई महापालिकेच्या प्रचारातही विकासाच्या मुख्यावरच काउंटर करतील, अशी अपेक्षा आहे.
कधी काळी गिरणगाव म्हणूनही या भागाची ओळख होती. गिरणी कामगार मोठ्या प्रमाणात या भागात राहायचा. मुंबईतील अनेक राजकीय-सामाजिक चळवळीचे केंद्रदेखील हा भाग होता. कॉग्रेस, कम्युनिस्ट यांचा कधीकाळी बालेकिल्ला असणाऱ्या या भागात नंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नावाच्या वादळाने आपला वरचष्मा निर्माण केला. वडील काँग्रेसी कम्युनिस्ट कार्यकर्ते, तर त्याच घरातील तरूण मुलगा शिवसैनिक असे चित्र अनेक घरात दिसायचे, पण बदलत्या काळासोबत राजकारणही बदलत गेले. सामाजिक वीणही बदलत गेली. आज परळ-लालबाग, भायखळा शिवडी या भागात मोठमोठाले टॉवर उभे राहिले आहेत. मॉल्सची रेलचेल झाली आहे. सार्वजनिक उत्सवांना आलेल्या व्यावसायिक रूपाने अर्थकारणही बदलले आहे.
माहिम, वरळी, शिवडी, भायखळा या चार विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंचे शिलेदार आहेत. त्यातील वरळीतून तर आदित्य ठाकरेच निवडून गेले आहेत. मलबार हिल, कुलाबा, सायन कोळीवाडा हे भाजपा, तर धारावी-मुंबादेवी हे काँग्रेसच्या ताब्यात आहेत, महापालिका निवडणुकांत त्यामुळे नेमकी कोण बाजी मारणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.






