नागपूर : “दहशतवाद्यांना आमच्या ताब्यात दिल्याशिवाय आम्ही युद्ध थांबवणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला ठणकावून सांगायला हवं होतं,” अशी तीव्र प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली आहे. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर गंभीर सवाल उपस्थित केले.
लोंढे म्हणाले, “जेव्हा देशावर राष्ट्रीय आपत्ती येते, तेव्हा सत्ताधारी आणि विरोधक असा भेद न ठेवता सर्वजण एकत्र येतात. तेव्हा आम्हीही एकजूट दाखवली होती. मात्र, प्रश्न असा आहे की जे लोक संसद आणि इतर ठिकाणी हल्ले करत आहेत, त्यांच्या प्रत्यर्पणाची मागणी का झाली नाही? पाकिस्तानने युद्ध थांबविण्याची विनंती केली, तेव्हा आपण अशा अतिरेक्यांना भारताच्या ताब्यात देण्याची अट का घातली नाही?” असा खडा सवाल अतूल लोंढे यांनी उपस्थित केला आहे.
“ही एक मोठी संधी होती, पण तीही आपण गमावली. हे स्पष्ट दिसत आहे. पाकिस्तान आणि काश्मीरचा मुद्दा हा पूर्णतः द्विपक्षीय आहे. त्यामुळे तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप आम्ही कधीच मान्य करणार नाही, असा करार आधीच झालेला आहे. मात्र तरीही अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जर धमकी दिली होती की ‘युद्ध थांबवा, नाहीतर व्यापार बंद करू’, तर त्या धमकीला ठाम उत्तर देणे गरजेचे होते. दुर्दैवाने पंतप्रधानांनी त्यावर कोणतीही ठाम भूमिका घेतली नाही.”
“आमची मागणी आहे की पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. स्वतः पंतप्रधानांनी त्या बैठकीला उपस्थित राहावे आणि संसद अधिवेशन बोलवावे. जेणेकरून या विषयावर सविस्तर चर्चा होईल, तसेच सैन्याच्या पराक्रमाचं सर्वांनी अभिनंदन करावं,” अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
शरद पवार यांच्या भूमिकेवर भाष्य करताना अतूल लोंढे म्हणाले, “सैन्याने केलेल्या पराक्रमाचं अभिनंदन करणं आवश्यक आहे. सर्वपक्षीय बैठकीत काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतात, पण त्यातही विरोधी पक्षाला विश्वासात घेणं ही एक नैतिक आणि संवैधानिक जबाबदारी आहे. हे एक महत्त्वाचं प्रोटोकॉल आहे.”