देव तारी त्याला...! 'माझ्या पोरांना सांभाळ' म्हणत तरुणाने घेतली नदीत उडी; पण...
नागपूर : घरातील परिस्थिती आणि आर्थिक तणावातून एका तरुणाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. नदीच्या काठावर पोहोचून पत्नीला फोन केला. ‘पोरांना सांभाळ, मी आत्महत्या करत आहे’, असे म्हणत नदीच्या पात्रात उडी घेतली. मात्र, वेळीच तेथे पोहोचलेल्या पोलिस आणि गावकऱ्यांनी पाण्यातून बाहेर काढत त्याचे प्राण वाचवले. ‘देव तारी त्याला कोण मारी’ अशी ही घटना नागपुरात घडली.
पंकज राजेंद्र खोब्रागडे (वय 33, रा. दृगधामणा, वाडी) असे या व्यक्तीचे नाव आहे. पंकज विवाहित असून, 6 वर्षांची मुलगीही आहे. तो आई-वडिलांसोबत वाडी परिसरात राहतो. त्याचा गादी तयार करण्याचा कारखाना आहे. त्याची आर्थिक स्थिती चांगली आहे. या व्यवसायासोबतच त्याने कर्ज घेऊन त्याने 12 लाख रुपये किंमतीचे (जुने) जेसीबी घेतले. बँकेचा हप्ता 35 हजार रुपये होता. सुरूवातीला त्याने नियमित कर्जाचे हप्ते भरले. मात्र, अलीकडे काम मिळत नसल्याने बँकेचे हप्ते थकले.
हेदेखील वाचा : Navi Mumbai Crime Case : 14 वर्षांनंतर अखेर आरोपी गजाआड; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, क्षुल्लक कारणावरुन केली होती हत्या
दरम्यान, हप्ते भरण्यासाठी दुसरा कुठलाच मार्ग त्याच्याकडे नव्हता. त्यामुळे तो तणावात राहू लागला. त्यानंतर त्याने निराश होऊन आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, त्याने नदीत उडीही मारली. मात्र, एका पोलिसाच्या सतर्कतेने त्याला नदीतून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे त्याचा जीव वाचला.
पोलिसांनी अशी दाखवली समयसूचकता…
सायबरचे पोलिस शिपाई सौरभ कारंडे यांनी तात्काळ त्याचे मोबाईल लोकेशन शोधले. मौदा हद्दीत नदीजवळ लोकेशन मिळाले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश तटकरे यांनी लगेच एएसआय विनोद कांबळे यांना मौद्याकडे रवाना केले. तत्पूर्वी मौदा पोलिस आणि स्थानिक नागरिकांना लक्ष ठेवण्यास सांगितले. तसेच पंकजला फोनवर गुंतवून ठेवण्यास त्याच्या पत्नीला सांगण्यात आले. स्थानिक पोलिस आणि गावातील काही युवक गोळा होताना पाहताच पंकजने पाण्यात उडी घेतली. गावातील युवकांनीही त्याच्या मागेच उडी घेऊन त्याला बाहेर काढले.
साताऱ्याच्या वाईत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
दुसऱ्या एका घटनेत, सुसंस्कृत आणि ऐतिहासिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाईमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत. शहरातील तरुण पिढी ऑनलाइन गेमिंग आणि जुगाराच्या विळख्यात अडकून बरबाद होत असून, लाखो रुपयांची उधळपट्टी करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या खेळात पैसे गमावल्याच्या नैराश्येतून काही तरुणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.