नवी मुंबई/सावन वैश्य : नवी मुंबईतील खळबळजनक घटना समोर येत आहे. गेल्या 14 वर्षांपूर्वी एरा क्षुल्लक कारणावरुन एका व्यक्तीची धारदार शस्त्राने हत्या करणारा आरोपी आता गजाआड झाला आहे. आजिनाथ त्र्यंबक दौंड याची 14 वर्षांपूर्वी हत्या केली होती. फक्त एक हजार रुपयांच्या देवाण-घेवाणीच्या वादातून लक्ष्मण गंगाधर काकडे यांनी आजिनाथ दौंड यांची धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून हत्या केली होती. गुन्हे शाखेने केंद्र शासनाच्या नोटग्रीड पोर्टलच्या मदतीने 14 वर्षांपासून फरार असलेला आरोपी लक्ष्मण गंगाधर काकडे याला अटक केली आहे.
मयत अजिनाथ दौंड व आरोपी लक्ष्मण काकडे 15 वर्षांपूर्वी एका ट्रकवर चालक व क्लीनर चे काम करत होते. त्यावेळी दोघांमध्ये एक हजार रुपयांची देवाण-घेवाण झाली होती. याच देवाणघेवाणीवरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की, लक्ष्मण काकडे याने आजिनाथ दौंड यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीतील सेक्टर 19 मध्ये हत्या केली होती. याबाबत एपीएमसी पोलिसांनी आरोपी विरोधात सीआरपीसी 299 अन्वये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
सदर गुन्ह्याबाबत मध्यवर्ती गुन्हे शाखेने महत्त्वाच्या कागदपत्रांची माहिती प्राप्त केली. केंद्र शासनाने विकसित केलेल्या नेटग्रीड पोर्टलच्या मदतीने व तांत्रिक तसेच कौशल्यपूर्ण तपास करून मध्यवर्ती गुन्हे शाखेने, आरोपी लक्ष्मण गंगाधर काकडे, वय 36 वर्ष, मूळ राहणार पाथर्डी, अहिल्यानगर, याला अटक केली आहे. आरोपीला पुढील तपासासाठी एपीएमसी पोलिसांच्या ताब्यात दिले असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.दरम्यान .या सगळ्या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.
दिवसेंदिवस नवी मुंबई आणि परिसरात गुन्ह्यांचं सत्र वाढत असल्याचं दिसून येत आहे. नवी मुंबईतील खारघर सेक्टर 8 मधील ‘व्हाईट ऑर्चिड स्पा’ या मसाज पार्लरच्या नावाखाली सुरु असलेल्या देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने कारवाई केला आहे. या कारवाईत स्पा मालक, मॅनेजर व मदतनीस अशा तिघांना अटक करण्यात आली असून, तेथे देहव्यापारासाठी जबरदस्तीने ठेवलेल्या सहा महिलांची सुटका करण्यात आली आहे.
अशा प्रकारच्या अनैतिक व्यवसायांना आळा घालण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली असून, कुठेही अशा संशयास्पद हालचाली आढळल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा. असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच जे नागरिक याबाबतची माहिती पोलिसांना देतील त्यांचे नावं गोपनीय ठेवण्यात येईल असे देखील सांगण्यात आले आहे. सर्वसामान्य नागरिक राहतात अशा या सुरक्षित असलेल्या ठिकाणी अशा घटना घडणं हे धक्कादायक असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.