स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ज्यांची हकालपट्टी केली आता त्यांचीच 'घरवापसी' केली
नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता काँग्रेसने आपले संघटन मजबूत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या क्रमाने, युवक काँग्रेसच्या कायमस्वरूपी हकालपट्टी केलेल्या पदाधिकाऱ्यांना परत आणण्यात आले आहे. यामध्ये प्रदेश उपाध्यक्ष तन्वीर विद्रोही, सरचिटणीस अनुराग भोईर, अक्षय हेटे, नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष मिथिलेश कन्हेरे यांचा समावेश आहे.
काँग्रेसच्या युवक नेतृत्त्वाकडून काही युवा नेत्यांची गेल्या सात महिन्यांपूर्वी हकालपट्टी करण्यात आली होती. नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे आणि महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे प्रभारी अजय चिकारा यांनी चौघांची अपात्रता रद्द करून पुन्हा नियुक्त केले आहे. आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांच्या एका विधानाविरोधात युवक काँग्रेस अध्यक्ष उदयभानू चिब यांच्या नेतृत्वाखाली संघ मुख्यालयासमोर मोर्चा काढण्यात येणार होता. त्यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत होते.
60 पदाधिकाऱ्यांना करण्यात आलं निलंबित
मोर्चात सहभागी न होण्याचे कारण देत ६० पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. अशाप्रकारच्या कारवाईमुळे संघटनेत खळबळ उडाली होती. यापैकी वरील ४ अधिकाऱ्यांना कायमचे काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली. काढण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांनी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि नंतर विद्यमान प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे न्याय मागितला होता.
अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप
कुणाल राऊत यांनी आपला प्रभाव वाढवण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर करून अधिकाऱ्यांना निलंबित केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर युवक काँग्रेसमधील गटबाजीही सार्वजनिक झाली. आता चार जणांची हकालपट्टी रद्द करण्यात आली. त्यात उदयभानू चिब, अजय चिकारा, शिवराज मोरे यांचा समावेश आहे. त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन यांचे आभार मानले आहेत.
अनेक नेतेमंडळी करताहेत प्रवेश
हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेतल्यापासून काँग्रेसमध्ये अनेक नेते, पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे. अशातच काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिला आहे. नंदूरबार जिल्ह्यातील भाजपचे नेते व माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या बुलढाणा येथील निवासस्थानी भेट घेऊन वळवी यांनी पक्षात प्रवेश केला आहे.