
फोटो सौजन्य AI
अमरावती रोडवरील मौजा गाडगा, खसरा क्र. ६५/५, नगर भूमापन क्र. २७७ येथील ३.८० एकर जागेचा हा विषय आहे. लीज संपल्यानंतर जमीन पुन्हा शासनाच्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नोटिशीनुसार १३ ऑगस्टला सकाळी ११ वाजता प्रत्यक्ष ताबा घेण्याची कारवाई करण्यात येणार आहे. व्हीएचएने स्वतः किंवा अधिकृत प्रतिनिधीद्वारे उपस्थित राहून जमीन शासनाकडे सुपूर्द करावी, असे निर्देश दिले आहे.
संस्था अनुपस्थित राहिल्यास किंवा ताबा देण्यास नकार दिल्यास नियमांनुसार एकतर्फी कारवाई करून शासन ताबा घेऊ शकते, असेही नोटिशीत नमूद आहे. यामुळे नागपुरातील हॉकीच्या अस्तित्वावर अंतिम मुदतीचे सावट आले आहे. यापूर्वी १७ जुलैला जिल्हाधिकाऱ्यांनी लीज रद्द करून तहसीलदारांना जमीन ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते.
जिल्हा प्रशासनाच्या अहवालानंतर व्हीएचएला दिलेल्या जमिनीची लीज कालावधी आणि वापराबाबत प्रश्न उपस्थित झाले, प्रशासनाचा दावा आहे की लीज संपल्यानंतर जमीन परत शासनाकडे घेणे ही नियमानुसार प्रक्रिया आहे. मात्र, व्हीएचएने या कारवाईला तीव्र विरोध केला आहे. असोसिएशनचे म्हणणे आहे की है मैदान नागपूरच्या हॉकीची ओळख आहे आणि येथे अनेक वर्षांपासून खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाते. या कारवाईत हस्तक्षेप करण्याची मागणी व्हीएचएने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
D-Martमध्ये धक्कादायक प्रकार! आईस्क्रीममध्ये जे सापडलं ते पाहून ग्राहकाला बसला धक्का
गाडगा (सिव्हिल लाइन्स) येथील हे मैदान नागपूर हॉकीचे प्रमुख केंद्र मानले जाते. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनी येथे सराव केला आहे. वर्षानुवर्षे येथे हॉकी स्पर्धा, प्रशिक्षण शिबिरे आणि विविध क्रीडा उपक्रम आयोजित होत आले आहेत. खेळ क्षेत्रातील जाणकारांच्या मते मैदानाचे भवितव्य आता शासनाच्या पुढील निर्णयावर अवलंबून आहे.
प्रशासनाने मैदान ताब्यात घेतल्यास पुढे त्याचा वापर कशाराठी होणार, हा मोठा प्रश्न आहे. नागपूरची हॉकी इतिहासजमा होणार का? शहरातील मुलांना हॉकी खेळण्यासाठी मैदान उपलब्ध राहणार का? या प्रश्नांची उत्तरे अद्याप अनिश्चित आहेत,
एका बाजूला जिल्हा प्रशासन लीज समाप्ती आणि नियमांच्या आधारे जमीन परत घेण्याची प्रक्रिया राबवत आहे तर दुसऱ्या बाजूला व्हीएचए ही ‘हॉकी मैदान वाचविण्याची लढाई असल्याचे सांगत आहे. त्यामुळे १३ ऑगस्टच्या कारवाईकडे क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे. या दिवशी नागपूरच्या ऐतिहासिक हॉकी मैदानाचे भवितव्य ठरणार आहे.