फोटो सौजन्य AI
या पार्श्वभूमीवर शुक्रवारी नागपूर महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासने संयुक्तपणे अतिक्रमणविरोधी मोहीम राबवली. गोधनी रोड, झिंगाबाई टाकळी आणि टॉवर रोड परिसरात झालेल्या या कारवाईत तब्बल ७० ते ८० अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात दिवसभर ही मोहीम सुरू होती.
महापालिका प्रशासनाने यावेळी अतिक्रमण हटविण्यासाठी विशेष नियोजन केले होते. मनपाच्या प्रवर्तन विभागाची दहा पथके सकाळपासूनच पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह संबंधित परिसरात दाखल झाली. मागील कारवाईदरम्यान काही ठिकाणी झालेला विरोध लक्षात घेऊन यावेळी सुरक्षेची विशेष खबरदारी घेण्यात आली होती.
पोलिसांच्या उपस्थितीत जेसीबीच्या साहाय्याने फुटपाथवरील पक्के शेड, अनधिकृत बांधकामे आणि रस्त्यांच्या कडेला उभारलेले अडथळे हटविण्यात आले. गोधनी रोड, झिंगाबाई टाकळी आणि टॉवर रोड या भागांत दिवसभर कारवाई सुरू राहिली. या मोहिमेत सुमारे ७० ते ८० बांधकामे पाडण्यात आली, तर जवळपास एका ट्रकभर अवैध साहित्य जप्त करण्यात आले. सार्वजनिक जागा मोकळ्या करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने ही कारवाई केली.
Nagpur News : स्थायी’च्या बैठकीत खडाजंगी; २४९ संगणक ऑपरेटर्सची गरज नेमकी किती ?
महापालिका आयुक्तांनी कारवाईच्या एक दिवस आधी घेतलेल्या आढावा बैठकीत अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला गती देण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. नागपूर सुधार प्रन्यास, मनपा मुख्यालयातील अतिक्रमण निर्मूलन पथक आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी समन्वयाने काम करण्याचे आदेश देण्यात आले होते.
रस्त्यांच्या दुतर्फा उभारलेली पक्की अनधिकृत बांधकामे हटविणे, फुटपाथ मोकळे करणे आणि भूखंडांवरील मोकळ्या जागांचा बेकायदेशीर व्यावसायिक वापर थांबविणे, हा मोहिमेचा प्रमुख उद्देश होता. शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवून नागरिकांना सुरक्षितपणे ये-जा करता यावी, यासाठी प्रशासनाने यंत्रणा सक्रिय केली. सर्व दहा झोनमधील पथकांना या मोहिमेत सहभागी करण्यात आले होते.
Nagpur News: आता चक्क नागपूरमध्ये समुद्रकिनारा, द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा देणार खास अनुभव
अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू असताना दुपारच्या सुमारास सुमारे ४० ते ५० फेरीवाल्यांनी कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांचा बंदोबस्त आणि प्रशासनाची तयारी यामुळे कारवाईवर त्याचा परिणाम झाला नाही. कोणतीही माघार न घेता पथकांनी अतिक्रमणे हटविण्याचे काम सुरूच ठेवले.
प्रवर्तन विभागाचे सहायक आयुक्त संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. मनपाच्या सर्व दहा झोनमधील सुमारे ५० ते ६० अधिकारी आणि कर्मचारी कारवाईत सहभागी झाले होते. मनपा आणि नासुप्रच्या संयुक्त प्रयत्नांमुळे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे हटविण्यात आली. मात्र, कारवाईनंतर पुन्हा त्याच जागांवर अतिक्रमणे होऊ नयेत, यासाठी प्रशासनाकडून सातत्याने देखरेख ठेवणेही महत्त्वाचे ठरणार आहे.






