
फोटो सौजन्य सोशल मीडिया
सीताबर्डी, इतवारी, महाल, धरमपेठ, सदर आणि सक्करदरा या प्रमुख व्यापारी भागांमध्ये सणांच्या काळात गर्दी वाढणार हे प्रशासनाला आधीपासूनच माहीत असते. तरीही त्यासाठी कायमस्वरूपी नियोजन होताना दिसत नाही. सणांपूर्वी बैठका होतात, वाहतूक आराखड्याच्या घोषणा केल्या जातात .परंतु प्रत्यक्षात रस्त्यांवरील परिस्थिती जैसे थेच राहते.
इतवारी, सीताबर्डीत ‘नो व्हेईकल’चा पर्याय : इतवारी आणि सीताबर्डीमध्ये सणासुदीच्या काळात खरेदीदारांची अक्षरशः झुंबड उडते. त्यात मालवाहू वाहनांसह दुचाकी आणि चारचाकी वाहनांची भर पडल्याने रस्त्यांवरील जागा अपुरी पडते. यासाठी मध्य प्रदेशातील भोपाळच्या न्यू मार्केटचा प्रयोग नागपुरसाठी मार्गदर्शक ठरू शकतो. तेथे बाजारपेठेचे प्रवेशद्वार बॅरिकेड करून वाहनांच्या प्रवेशाला वेळेची मर्यादा घातली. बाजार सुरू झाल्यानंतर ग्राहकांना पायीच प्रवेश दिला जातो. नागपुरातही अशी व्यवस्था लागू केल्यास वाहतुकीवरील ताण कमी होऊ शकतो.
वाहतूक नियंत्रणाच्या नावाखाली प्रमुख मार्गावर लोखंडी बॅरिकेड उभारून रस्ते बंद करण्याची पद्धत आता नागरिकांच्या अडचणी वाढवित आहे. एखादा मार्ग बंद केल्यानंतर वाहनांचा भार साहजिकच दुसऱ्या रस्त्यावर जातो. वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्ता बंद करणे हा सोपा पर्याय स्वीकारला जात असल्याची नागरिकांची भावना आहे.
सणासुदीच्या काळात सर्वाधिक त्रास रोजच्या प्रवासावर अवलंबून असलेल्या नागरिकाना सहन करावा लागतो. वेळ, इंधन आणि मानसिक तणाव अशा तिन्ही पातळ्यांवर नागरिकांना त्याची किंमत मोजावी लागत आहे.
कस्तुरचंद पार्क परिसरातील वाहतूक व्यवस्थेची स्थिती विशेष गंभीर आहे. मैदानाभोवतीचे आणि त्याला जोडलेले प्रमुख मार्ग वाहनांच्या वाढत्या दबावामुळे अडथळ्यांत सापडले आहेत.