
nagpur
नागपूर: मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने २०२५ या वर्षात पायाभूत सुविधा विकास, प्रवासी-केंद्रित सेवा, सुरक्षितता, तांत्रिक नवोपक्रम आणि ऑपरेशनल उत्कृष्टतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत नवे मानक प्रस्थापित केले आहे. मालवाहतूक, प्रवासी सेवा तसेच उत्पन्नवाढ या सर्वच आघाड्यांवर विभागाने भरीव प्रगती साधल्याची माहिती मध्य रेल्वे नागपूर विभागाने दिली.
२०२५ मधील सर्वात मोठ्या कामगिरींपैकी एक म्हणजे न्यू मकरधोक्रा येथे ५ वे गु कम टर्मिनल (जीसीटी) कार्यान्वित करण्यात आले. मध्य रेल्वेवरील अशा प्रकारचे हे पहिले टर्मिनल आहे. सायलो-आधारित लोडिंग सुविधा आणि एकात्मिक प्री-वेज बिन प्रणालीने ते सुसज्ज आहे. यामुळे मालवाहतूक हाताळणीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. टर्मिनलवरील डिटेन्शन वेळेत लक्षणीय घट झाली आहे. याशिवाय ईआयएम वजन पुलांवर चाक-निहाय भार मापन प्रणाली लागू करून नागपूर विभागाने मध्य रेल्वेवर प्रथम स्थान पटकावले आहे. यामुळे सुरक्षित आणि संतुलित मालवाहतूक सुनिश्चित होत आहे. तंत्रज्ञान व सुरक्षिततेच्या दृष्टीनेही नागपूर विभागाने महत्त्वाची कामगिरी नोंदवली आहे. अजनी इलेट्रिक लोको शेडमधून पहिले बख्तरबंद लोकोमोटिव्ह (कवच प्रणालीसह) पाठविले. आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत विकसित ही एसआयएल-4 प्रमाणित प्रणाली स्वयंचलित ब्रेकिंग, ओव्हरस्पीड संरक्षण आणि कॅब सिग्नलिंगद्वारे संभाव्य ट्रेन अपघात टाळण्यास मदत करते. तसेच टीआरडी विभागाने ३० केव्ही डायलेट्रिक सेफ्टी शूज, हाय-राईज पेंटोग्राफ तसेच एआय व जीपीएस-आधारित ओएचई मॉनिटरिंग सिस्टीमसारख्या नवकल्पना अमलात आणल्या आहेत.
एप्रिल-नोव्हेंबरमध्ये तब्बल ३ हजार ४०२ कोटींचे उत्पन्न
व्यवसाय कामगिरीतही नागपूर विभागाने उल्लेखनीय प्रगती केली. एप्रिल ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत विभागाने एकूण ३४०२.१५ कोटींचे मुख्य उत्पन्न मिळवले. यामध्ये मालवाहतुकीतून २८४४.२१ कोटी तर प्रवासी वाहतुकीतून ४९२.०१ कोटींचा समावेश आहे. रेल्वे मदत प्रणालीअंतर्गत तक्रार निवारणाचा सरासरी कालावधी केवळ १६ मिनिटांपर्यंत कमी झाला असून, प्रवाशांचे समाधान प्रमाण ८२.५७ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.
पुणे वंदे भारतला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर रेल्वे स्थानकाच्या शताब्दीनिमित्त आयोजित भव्य प्रदर्शनात रेल्वेचा समृद्ध वारसा आणि नव्या सेवांवर प्रकाश टाकण्यात आला. याचवर्षी १० ऑगस्ट २०२५ रोजी सुरू केलेल्या अजनी-पुणे वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या मार्गावर प्रीमियम सेवेची दीर्घकाळची मागणी होती. आज ही ट्रेन देशातील सर्वाधिक यशस्वी वंदे भारत एक्सप्रेसपैकी एक ठरली आहे. एकूणच २०२५ मध्ये मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने विकास, सुरक्षितता आणि प्रवासी समाधान या तिन्ही आघाड्यांवर भक्कम कामगिरी करीत भविष्यकालीन रेल्वे सेवांसाठी मजबूत पायाभरणी केली आहे.
प्रभावी मोहिमांमधून सुरक्षिततेवर दिला विशेष भर
रेल्वे संरक्षण दलाने ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ सह दारू व अंमली पदार्थाविरोधात प्रभावी मोहिमा राबवल्या. बाल संरक्षण, बेकायदेशीर दारू व ड्रग्जविरोधातील कारवाईत ५७० बेकायदेशीर सामानाच्या प्रकरणांमध्ये सुमारे १.३२ कोटींची मालमत्ता जप्त केली.