
नाना पाटेकरांच्या आठवणी सांगताना प्रताप सरनाईकांना अश्रू अनावर; 'अंकुश' चित्रपटाचा सांगितला खास किस्सा
आपल्या आणि नाना पाटेकर यांच्या जुन्या आठवणी सांगताना सरनाईक म्हणाले की, ‘‘मी जेव्हा २०-२२ वर्षांचा होतो, त्यावेळी नाना पाटेकर यांचा ‘अंकुश’ हा चित्रपट पाहिला. त्या चित्रपटाचा माझ्यावर इतका प्रभाव पडला की, मी माझ्या रिक्षांवर ‘अंकुश’ हे नाव ठेवले होते. पुढे नाना पाटेकर यांच्या ‘नाम फाउंडेशन’ला पहिला दहा लाख रुपयांचा धनादेश देण्याचा योगही मला आला. त्यावेळी त्यांनी माझे कौतुक करताना राजकीय क्षेत्रात अशा प्रकारे ठामपणे उभे राहणारे फार कमी लोक असतात आणि त्यापैकी तू एक आहेस, असे म्हटले होते.’’
Nana Patekar: नाना पाटेकरांच्या शेवटच्या फोन कॉलची हृदयस्पर्शी आठवण; ‘लव यु बाळा’ म्हणत निरोप
नाना पाटेकर यांच्याशी आपले जिव्हाळ्याचे संबंध होते, असे सांगत सरनाईक म्हणाले की, ‘‘गरज भासली की नानांना भेटायचो. अगदी गेल्याच महिन्यात आम्ही विमानतळावर एकत्र होतो. त्यावेळी त्यांनी मला विचारले, ‘रे प्रताप, तुझे वय किती?’ मी त्यांना सांगितले की, माझे वय ६२ वर्षे आहे. त्यावर त्यांनी स्वतःच्या वयाचा उल्लेख करत गमतीने संवाद साधला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा आणि आपलेपणा कायम लक्षात राहील.’’
नाना पाटेकर यांच्या अभिनयाचे वर्णन करताना सरनाईक यांनी त्यांना खऱ्या अर्थाने ‘नटसम्राट’ संबोधले. ‘‘अनेक नटसम्राट झाले, परंतु खऱ्या अर्थाने नटसम्राट कोणाला म्हणायचे असेल तर ते नाना पाटेकर होते. त्यांच्या अभिनयाची स्वतःची एक वेगळी शैली होती. ‘कांदा लेलो, बटाटा लेलो’ हा एखादा मोठा संवाद नव्हता; मात्र नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयातून त्यालाही अजरामर केले. एखाद्या साध्या वाक्यालाही आपल्या अभिनयाच्या ताकदीने लोकांच्या मनात घर करून देण्याची क्षमता त्यांच्यात होती,’’ असे सरनाईक म्हणाले.
राजकीय कार्यक्रमांना नाना पाटेकर यांना आमंत्रित करण्याच्या आठवणीही सरनाईक यांनी सांगितल्या. ‘‘मी त्यांना एखाद्या कार्यक्रमासाठी बोलावले की ते मला म्हणायचे, ‘मला जर बोलावशील तर तुझ्या पायावर धोंडा मारून घेशील. मला राजकीय नेत्यांबद्दल फारसं चांगलं बोलता येत नाही. तू माझा मित्र असलास तरी माझ्याकडून चांगले बोलण्याची अपेक्षा ठेवू नकोस.’ त्यांच्या स्पष्टवक्तेपणाची हीच खासियत होती,’’ असे सरनाईक यांनी सांगितले.
‘‘आज सकाळी नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समजली आणि मनाला खूप वाईट वाटले. एक उमदा, संवेदनशील आणि असामान्य कलाकार आज आपल्यातून निघून गेला आहे. त्यांच्या आठवणी कायम मनात राहतील. नाना पाटेकर यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली,’’ अशा शब्दांत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
नाना पाटेकरांच्या निधनाने रझा मुराद भावुक; आठवणींना उजाळा देत वाहिली श्रद्धांजली