
कार्तिकी एकादशी यात्रेसाठी एसटी महामंडळाचा मोठा निर्णय; भाविकांसाठी १ हजार जादा बसेसची व्यवस्था
आषाढी एकादशीप्रमाणेच कार्तिकी एकादशीलाही वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व आहे. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला प्रबोधिनी एकादशी असेही संबोधले जाते. भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून या दिवशी जागे होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्यामुळे या पवित्र पर्वानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांतून लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होतात. चंद्रभागेच्या पवित्र तीरावर भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा अनुपम सोहळा अनुभवायला मिळतो.
भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने पंढरपूर येथील चंद्रभागा बसस्थानकातून राज्यातील विविध भागांसाठी जादा बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे. दर्शनानंतर भाविकांना आपल्या गावी परतण्यासाठीही पुरेशा बसगाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गर्दीचे नियोजन, बसफेऱ्यांचे व्यवस्थापन आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत महामंडळाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे.
एसटी महामंडळाच्या माध्यमातून अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा, तर ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना तिकिटाच्या दरात ५० टक्के सवलत दिली जाते. या सवलतींचा लाभ घेत भाविकांनी खासगी वाहनांऐवजी एसटीच्या सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवाससेवेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
‘भक्तीचा प्रवास असो वा परतीची वाट, वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसटीची लालपरी सदैव सज्ज आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाचा प्रवास सुरक्षित, सुखकर आणि आनंददायी व्हावा, यासाठी एसटी महामंडळ कटिबद्ध आहे,’ असा विश्वासही मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.
Ans: कार्तिकी एकादशी यात्रेसाठी एसटी महामंडळाने १ हजार जादा बसेस सज्ज ठेवल्या आहेत.
Ans: पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास सुरक्षित, आरामदायी आणि सुखकर करणे हा यामागील उद्देश आहे.
Ans: परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी भाविकांना एसटीच्या सेवेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे.