शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, मुठभर श्रीमंतासाठी...
नागपूर : विदर्भ व मराठवाड्याच्या जनतेला न्याय देण्यासाठी हिवाळी अधिवेशनात चर्चा होणे अपेक्षित होते पण अशी कोणतीच चर्चा झाली नाही. मविआ सरकार असताना याच अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती पण भाजपा युती सरकारने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन देऊनही कर्जमाफीची घोषणा केली नाही. गडचिरोलीत विपुल खनिज संपत्ती आहे ती लाडका उद्योगपती लुटत आहे. धारावी प्रकल्प अदानीलाच देण्याचा निर्णय सरकारने केला आहे. अधिवेशनातून सरकारने जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत. भाजपा युती सरकार हे गरीब, तरुण, शेतकऱ्यांचे नाही तर मुठभर श्रीमंताचे आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
हिवाळी अधिवेशनाचे सुप वाजल्यानंतर महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले यांनी सरकारवर तोफ डागली, ते पुढे म्हणाले की, बीड व परभणीतील घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत, सरकारने गुंडगिरी पोसल्याचे परिणाम बीडमध्येही दिसले. पोलीसांमध्येही गुंडाराज आले आहे का? असा प्रश्न पडतो. परभणीत पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन केले, त्यात अनेकांना जबर मारहाण केली, सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस मारहाणीत झाला पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलिसांचा बचाव केला. परभणी प्रकरणात फक्त एका पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्यात आली. निष्णात वकिलाप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी बीड प्रकरणात एका मंत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री आपली खूर्ची वाचवण्यासाठी मित्रपक्षांच्या मंत्र्यांना घाबरतात असे दिसते.
हे सुद्धा वाचा : पुण्यातील स्वारगेट भागात तरुणावर कोयत्याने हल्ला; सपासप वार केले अन्…
परभणी व बीड प्रकरणावरुन आक्रमक
दरम्यान परभणी व बीड जिल्ह्यातील प्रकरणावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. यावरुन नाना पटोले यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ह्या पुरोगामी महाराष्ट्राला व संताच्या भूमीला कलंक लावणाऱ्या आहेत. शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचार संपवण्याचा हा प्रयत्न आहे. परभणीत पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सुर्यवंशी यांचा झालेला मृत्यू हा पोलिसांनी केलेली हत्या असून या हत्येप्रकरणी जबाबदार पोलिसांवर अद्याप कठोर कारवाई का केली नाही? राजकीय आशिर्वादाने महाराष्ट्रात सुरु असलेल्या गुंडाराजचा कायमचा बिमोड करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
विधानसभेत परभणी व बीड जिल्ह्यातील घटनांवरील चर्चेत बोलताना नाना पटोले यांनी सरकारचे वाभाडे काढले, ते पुढे म्हणाले की, महायुतीच्या अडीच वर्षांच्या काळात राज्यात गुंडगिरीला संरक्षण देण्याचा प्रयत्न झाला आहे. बीडमधील वाल्मिक कराडवर ३०२ सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्याला पोलीस संरक्षण दिले, त्याला पोलीस संरक्षण देण्याची शिफारस करणारा कोण? त्याला कशासाठी पोलीस संरक्षण दिले? परळीत आंधळे व गीते यांच्यात गोळीबार झाला, त्यात गीते यांचा मृत्यू झाला, या प्रकरणात वाल्मिक कराड या व्यक्तीचा संबंध आहे. असं पटोले म्हणाले.