
Maharashtra Municipal Election 2025
गजानन मंदिर पासून सुरु होणारा हा प्रभाग कॅनॉल रोड व डी मार्ट पर्यंत पसरलेला आहे, या प्रभागातून सध्या भाजपाकडून इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे पक्षश्रेष्ठींपुढे उमेदवारी कोणाला द्यायची हा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपाकडून विद्यमान नगरसेविका ज्योती कल्याणकर, सुनंदा पाटील, दीपक पाटील, संतोष परळीकर, अश्विनी परळीकर, दिनेश मोरताळे शशिकांत क्षीरसागर, यादवराव कल्याणकर, सागर डहाळे, दत्तात्रय मुंडकर, गौरव कुंटूरकर, अॅड अभिलाष नाईक, नाईक, मोरताळे, उमेश माळगे, सरस्वती राऊत, सारिका शिवाजी भालेराव, प्रतीक्षा सावंत, सौंदते, यांच्यासह अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत. अ प्रभाग खुला पुरुष गट, व प्रभाग खुला महिला गट, क प्रभाग ओबीसी पुरुष, ड मधून एससी महिला असे चार नगरसेवक निवडून द्यायचे आहेत.
भारतीय जनता पक्षाकडून (BJP) महानगरपालिका निवडणुकीचे सूक्ष्म नियोजन करण्यात आलेले असून दोन वेळा मुलाखती पार पडलेले आहेत. इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे व निवडणूक लढविण्यासाठी जास्त पैसा खर्च कोण करू शकतो यावर उमेदवारी मिळणार असल्यामुळे प्रत्येक जण या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर माया खर्च करणार आहे.
शिवसेनेकडून अद्याप उमेदवाराच्या मुलाखती झालेल्या नसल्या तरी या प्रभागामध्ये एकनाथ कल्याणकर, आमदारांचे पुत्र सुहास बालाजी कल्याणकर, योगेश मुंडे, डॉ. प्रतीक्षा धुतडे शशिकांत कलाने पाटील इच्छुक असल्याचे बॅनर्स या प्रभागांमध्ये लागलेले आहेत. तसेच शिवसेनेच्या इच्छुकांच्या वतीने भव्य योग सप्ताह घेण्यात आला. या योग सप्ताहाला शहरातील सर्वच भागातून नागरिक मोठ्या संख्येने आले होते. या योग सप्ताहाला नांदेड दक्षिणमधील शिवसेनेचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा व शिवसेना युती होणार असल्याची चर्चा सध्या शहरात होत असून नागपूर मध्ये या संदर्भात प्राथमिक चर्चा मुख्यमंत्र्यांनी नांदेड मधील नेत्यांना बोलावून केली असल्याचे समजते. युती झाल्यास भाजपामधील इच्छुकांची अडचण होणार असून त्यांना इतर पक्षांमध्ये पक्षांतर करावे लागणार आहे. तशी पयर्यायी व्यवस्था अनेक इच्छुकांनी केली आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षातर्फे इच्छुक उमेदवार कोण आहेत हे अद्यापही गुलदस्त्यामध्ये आहे. काँग्रेस पक्षाकडून प्रभाग एक साठी इच्छुक उमेदवार अद्यापही शहरांमध्ये बॅनर लावण्यासाठी इच्छुक दिसत नसल्यामुळे निवडणूक या पक्षाने गांभीर्याने घेतलेली दिसून येत नाही. शिवसेना ठाकरे गटाचे नेमके किती उमेदवार या प्रभागातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत हे सुद्धा अजून समोर आलेले नाही. राष्ट्रवादी पक्षाकडून या भागात इच्छुक उमेदवाराची चाचपणी करण्यात येत असून भाजपाकडून तिकीट न मिळाल्यास अनेक जण आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीमध्ये दाखल होऊन राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू शकतात असा अंदाज वर्तविला जात आहे.
या प्रभागातील काही नगरसेवकांनी नागरिकांशी सातत्याने वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठी संपर्क ठेवला होता, परंतु काही नगरसेवकांनी मात्र केवळ पक्षाच्या उपक्रमामध्ये उपस्थिती लावणे एवढाच कार्यक्रम पाच वर्षाच्या कार्यकाळात केला. आमदार बालाजी कल्याणकर यांचा प्रारंभीचा नगरसेवक पदाचा कार्यकाळ न्यायालयीन लढाई लढण्यासाठी गेला. ज्यांच्या विरोधात त्यांना न्यायालयीन लढाई लढावी लागली त्यांनीच पुन्हा मागील वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा प्रचार हिरिरीने केला हे विशेष. आमदार बालाजी कल्याणकर हे सातत्याने नागरिकांच्या संपर्कात असणारे लोकप्रतिनिधी असल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील काहीजण या प्रभागांमध्ये इच्छुक असल्याचे समजते.
या प्रभागातील काही नव्या वसाहतीमध्ये अजूनही पक्के रस्ते झालेले नाहीत. अनेक ठिकाणी सीसी रस्ते झाल्यानंतर त्या ठिकाणी ड्रेनेजच्या लाईन टाकण्यासाठी हे रस्ते फोडण्यात आले. पावसाळ्यामध्ये अनेक भागात पाणी शिरल्यामुळे नागरिकांच्या घरात पावसाच्या पाण्याचा तलाव निर्माण झाला होता, काही वसाहतीमध्ये चिखल तुडवत नागरिकांना घरापर्यंत पोहोचावे लागते व पावसाळ्यात वाहने रस्त्यावरच ठेवून घरी जावे लागते अशी बिकट परिस्थिती आहे. या प्रभागामध्ये बुधवारचा बाजार रस्त्यावर बसत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. कॅनॉल रस्त्यावर अद्यापही वाहतूक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली नाही. तसेच कॅनॉल रस्त्यावर रस्त्याच्या मधोमध नागरिक घरातील कचरा व उरलेले अन्नपदार्थ टाकत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधीचा सामना करावा लागतो.
या परिसरात महानगरपालिकेची एकही उद्यान नसल्यामुळे प्रभागातील लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यान किवा मैदान, वाचनकट्टे उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी सातत्याने होत आहे. या भागात शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे या प्रभागात खुल्या प्लॉटवे भाव गगनाला भिडले आहेत, प्लॉट माफिया व बिल्डर्स यांची या निवडणुकीमध्ये महत्वाची भूमिका राहणार आहे. हा प्रभाग हिंदुत्वाच्या बाजूने विधानसभा व लोकसभा निवडणुकीमध्ये राहिल्यामुळे या प्रभागातून भाजपा व शिवसेनेला निवडणूक सोपी जाऊ शकते असा राजकीय अंदाज वर्तविला जात आहे.