
Nanded Ward Number 6, disgruntled BJP workers will pose a challenge for the party
NMC Election 2026 : नांदेड : शहरातील प्रभाग क्रमांक ६ मध्ये भाजपाला यावेळी मतदारांच्या तीव नाराजीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. मनपा निवडणुकीत भाजपाने माजी नगरसेविका वैशाली मिलिंद देशमुख यांना पुन्हा संधी दिली. काँग्रेसमधून भाजपात आलेले राजू यन्नम आणि शीला किशोर भवरे व तसेच आशिष नेरलकर हे देखील भाजपाच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत. मात्र, या चारही उमेदवारांविरोधात प्रभागातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. नागरिकांच्या मते, भाजपाचे चारही उमेदवार हे वार्डात फिरून काम करणारे नसून घरात बसून कारभार करणारे आहेत.
विशेष म्हणजे, भाजपामधील माजी महापौरांबाबत प्रभाग क्र. ६ मधील अनेक नगरांमध्ये उघडपणे संताप व्यक्त केला जात आहे. त्याच्या कार्यपद्धतीमुळेच भाजपाची प्रतिमा मलिन झाली. याचा फटका थेट महापालिका निवडणुकीत बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘ही निवडणूक उमेदवारांची नाही, जनतेच्या रोषाची’ एकूणच, प्रभाग क्रमांक ६ मध्ये ही निवडणूक केवळ पक्षाची नसून जनतेच्या रोषाची आणि नाराजीची ठरण्याची चिन्हे आहेत.
हे देखील वाचा : महायुतीच्या सभेमध्ये रवींद्र चव्हाणांचा लुंगी लूक; रसमलाई इफेक्ट म्हणत संजय राऊतांचा घणाघात
बंडखोरीला बक्षीस?; कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मिलिंद देशमुख यांनी केलेल्या बंडखोरीनंतर अवघ्या दोन महिन्यांत भाजपात पुनः प्रवेश करून पुन्हा उमेदवारी मिळाल्याने भाजपाच्या निष्ठावंत कार्यकत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. “निष्ठावंतांना डावलून बंडखोरांना संधी देण्याची ही राजकीय खेळी भाजपासाठी घातक ठरू शकते,” अशी प्रतिक्रिया स्थानिक पातळीवर ऐकू येत आहे.
विरोधकांना मतदार हिसका दाखवतील – खा. रवींद्र चव्हाण
नांदेड प्रत्येक निवडणुकीत नांदेडच्या जनतेने काँग्रेसच्या बाजुने कौल दिला आहे. काँग्रेसच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास असून यावेळीही तो कायम राहणार यात शंका नाही. सत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या विरोधकांना मतदार निश्चितच हिसका दाखवतील, असा विश्वास खासदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. प्रभाग क्र ११, १३ व १५ मधील काँग्रेस-वंचित आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ठिकठिकाणी आयोजित प्रचारसभेत खासदार चव्हाण यांनी विरोधकांनी त्यांच्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची खिल्ली उडवली.
हे देखील वाचा : देवेंद्र फडणवीस हे स्वतःच्या हिंमतीवर झालेले मुख्यमंत्री नाही; राज ठाकरेंनी पुन्हा डिवचलं
ते म्हणाले, काँग्रेस कार्यकाळातच झालेल्या कामांचा उल्लेख त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात केला आहे. आमच्याकडे व्हीजन असल्याचा आव आणणाऱ्यांनी जनतेची दिशाभूल करू नये. महायुतीतील तिन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध कुरघोडी करीत आहेत. जनतेच्या हिताचे कुठलेच व्हीजन त्यांच्याकडे नाही, असाही हल्लाबोल त्यांनी केला. काँग्रेस-वंचितने आपल्या जाहीरनाम्यात पुढील पाच वर्षांचा नियोजित आराखडा मांडला असून जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्यास काँग्रेस वंचित आघाडी वचनबद्ध आहे. विरोधकांनी जुन्या आणि वय झालेल्या त्याच त्या उमेदवारांना उमेदवारी दिली. त्यांचे उमेदवार जनतेच्या अपेक्षा काय पूर्ण करणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. याउलट काँग्रेसने नवतरुणांना, जनतेच्या समस्या जाणून घेणाऱ्या आणि विकासाची तळमळ असलेल्या उमेदवारांना संधी दिल्याचे खा. चव्हाण यांनी स्पष्ट केले. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती या तत्वावर ही निवडणूक होत आहे.