
खरातच्या 'विळख्यात' सुशिक्षित कुटुंब; 'दैवी शक्ती'च्या नावाखाली अबलेवर अडीच वर्षे अत्याचार
अरविंद जाधव, नाशिक : समाजातील अज्ञान आणि अंधश्रद्धेचा फायदा घेऊन एखादा व्यक्ती किती थराला जाऊ शकतो, याचे अंगावर शहारे आणणारे उदाहरण म्हणजे हे कॅप्टन खरातचे प्रकरण आहे. स्वतःला ‘ब्रह्मांडशास्त्रज्ञ’ आणि ‘अंकशास्त्रज्ञ’ म्हणवून घेणाऱ्या एका भोंदू बाबाने, लग्नातील अडथळे दूर करण्याच्या नावाखाली एका महिलेवर सलग अडीच वर्षे बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणातील पीडिता उच्चशिक्षित असूनही, लग्न जमत नसल्याच्या सामाजिक दबावापोटी तिचे कुटुंब संशयित अशोक खरात याच्या जाळ्यात अडकले. मार्च २०१९ पासून सुरू झालेला हा प्रवास ‘विधी न केल्यास होणारा पती मरेल’ अशा मानसिक दहशतीपर्यंत पोहोचला. केवळ एक खडा गळ्यातून काढल्यामुळे लग्न मोडले, असा आभास निर्माण करून संशयिताने पीडितेच्या मनात मृत्यूची भीती घातली.
श्रद्धेचे रूपांतर जेव्हा अशा दहशतीत होते, तेव्हा माणूस विचार करण्याची शक्ती गमावतो, हेच या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. प्रसादाच्या नावाखाली विश्वासघात कॅनडा कॉर्नर येथील ‘ओकस प्रॉपर्टीज’ या कार्यालयातून हा भोंदूगिरीचा काळा धंदा सुरू होता. २०२२ मध्ये पीडितेला प्रसादाच्या नावाखाली गुंगीचे औषध देऊन पहिल्यांदा अत्याचार करण्यात आला. संतापजनक बाब म्हणजे, २०२३ मध्ये पीडितेच्या पतीला चेंबरबाहेर बसवून संशयिताने हे घृणास्पद कृत्य केले. नोव्हेंबर २०२२ ते डिसेंबर २०२५ या काळात पतीला जीवे मारण्याची आणि चारित्र्यहननाची धमकी देऊन त्याने पीडितेचे आयुष्य उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला.
राजकीय वरदहस्तांचा उपयोग करीत कॅप्टन खरात मागील काही दिवसांपासून महसूलसह ग्रामविकास, पोलिस या विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये सक्रीय सहभागी असायचा, अधिकाऱ्याच्या सततच्या वर्दळीमुळे खरातच्या भक्तांची संख्याही झपाट्याने वाढली तसेच त्याच्याकडे आर्थिक ओषही सुरू झाला.
संशयित अशोक खरात हा सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो ‘मर्चेंट नेव्हीं या खासगी नोकरीतून निवृत्त झाल्याचा दावा आहे. गत २० वर्षांपूर्वी नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरात त्याने दुकान थाटले. ‘कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट’ आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून तो नावारुपाला आला. अनेक बड़े राजकीय नेते, शासकीय अधिकारी, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जातात. भोंदूगिरी, भविष्यवाणी, स्वतः मध्ये दैवी अवतार असल्याचे भासवून त्याने अनेकांना ‘जाळ्यात ओढले आहे. दरम्यान, नोव्हेंबर २०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी मिरगाव येथील मंदिरात भेट दिल्यानंतर ते चर्चेत आले होते.
गोशाळेच्या नावाखाली संस्थानला कोट्यवधी रुपयाच्या देणग्या मिळाल्या होत्या. मात्र, प्रत्यक्ष गोशाळा उभी न राहिल्याने ट्रस्टमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाले होते. या वादातूनच जुन्या तीन ट्रस्टीनी राजीनामे दिले होते, त्यानंतर खरातने पत्नी रूपाली आणि जवळच्या व्यक्तीची ट्रस्टी म्हणून नियुक्ती केली. दरम्यान, अजूनही काही पीडित महिला असल्यास त्यांनी तक्रार करण्यासाठी पुढे यावे, त्यांची ओळख गोपनीय ठेवून त्यांना साक्षीदार म्हणून नोंदवले जाईल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.