
अशोक खरातच्या अडचणी आणखी वाढणार
नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात ऊर्फ कॅप्टन याच्याविरोधातील खटल्याला आता वेग आला आहे. या प्रकरणातील पहिल्याच गुन्ह्यात पोलिसांनी तब्बल 105 साक्षीदारांचे जबाब नोंदवत भक्कम पुरावे गोळा केले आहेत. या गंभीर प्रकरणाचा प्रभावीपणे पाठपुरावा करण्यासाठी राज्य शासनाने विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली असून, दोन गुन्ह्यांतील दोषारोपपत्र नाशिक सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.
मंगळवारी या खटल्याची पहिली सुनावणी सत्र न्यायालयात झाली. सुरक्षेच्या कारणास्तव संशयित अशोक खरात याला कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ जुलै रोजी ठेवली आहे. यापूर्वी विशेष तपास पथकाने या गुन्ह्यांचे दोषारोपपत्र नाशिक जिल्हा न्यायालयात दाखल केले होते. मात्र, गुन्ह्यांचे स्वरूप अत्यंत गंभीर असल्याने हे खटले सत्र न्यायालयात चालवण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार दोषारोपपत्रे सत्र न्यायालयात वर्ग करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
भोंदूविरुद्ध 18 गुन्ह्यांची नोंद
अशोक खरात हा 18 मार्चपासून न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्याविरोधात आतापर्यंत एकूण १८ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी ८ गुन्हे महिलांवरील लैंगिक अत्याचाराशी संबंधित आहेत. तर उर्वरित १० गुन्हे आर्थिक फसवणूक, अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे उल्लंघन तसेच महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अंतर्गत नोंदवण्यात आले आहेत.
अॅड. निकम सरकार पक्षाची बाजू मांडणार
२२ जून रोजी दोन गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ३० जून रोजी आणखी दोन गुन्ह्यांतील दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत खरातविरुद्ध दाखल असलेल्या चार गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र दाखल झाले असून, या खटल्यांच्या सुनावणीला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. सरकार पक्षाची बाजू विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम मांडणार असून, त्यांना सहायक विशेष सरकारी वकील म्हणून अहिल्यानगरचे अॅड. परिमल फळे सहकार्य करणार आहेत. खरातविरुद्धचा पहिला गुन्हा १७ एप्रिल रोजी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. या गुन्याच्याच जपासादरम्यान अपोलिसांनी १०५ महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत.
24 अधिकाऱ्यांचे विशेष तपास पथक
महाराष्ट्र पोलीस महासंचालकांच्या आदेशानंतर २० मार्च २०२६ पासून या संपूर्ण प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडे सोपवण्यात आला. या पथकात पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते, उपअधीक्षक अमोल भारती, किरणकुमार सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्यासह एकूण २४ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या पथकाने सखोल तपास करून विविध गुन्ह्यांतील दोषारोपपत्रे तयार केली असून, आता त्यावर सत्र न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे.
अशोक खरात प्रकरणानंतर कारवाईला वेग; राज्यात दोन महिन्यांत तब्बल 35 भोंदू महाराजांविरोधात गुन्हे दाखल