
प्रचारासाठी अवघे सात दिवस, नेत्यांच्या प्रचारसभानंतर वातावरण बदलणार
महापालिका निवडणूकीच्या प्रचाराला प्रत्यक्ष माघारीनंतर सुरूवात झाली असली तरी, बहुतांशी इच्छुकांनी तत्पुर्वीच गेल्या तीन ते चार महिन्यांपासून तयारी सुरू करून प्रभागात विविध कामांच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधण्यास सुरूवात केली होती. मात्र पक्ष कोणता याबाबत मौन बाळगण्यात आले. ज्यांनी पक्षाची उमेदवारीची आस घरली त्यांच्या नशिबी शेवटच्या क्षणाला अवहेलना आल्याने त्यांनी अपक्ष म्हणून तर काहीनी पक्षांतराची वाट धरली. आता मात्र प्रत्यक्ष निवडणूक प्रचाराला सुरूवात झाल्याने उमेदवारांनी पक्ष चिन्हासह प्रचाराला सुरूवात केली असून, प्रत्येक प्रभागात सुमारे ४० ते ४५ हजार मतदार असल्याने त्यांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी धडपड केली जात आहे. प्रचार रॅली, पदयात्रा, प्रचारपत्रके पोहोचवली जात असून, प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांना मात्र पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सभांची प्रतिक्षा आहे. महापालिका निवडणूकीचा जाहीर प्रचार येत्या मंगळवारी (दि.१३) सायंकाळी संपुष्टात येणार आहे.
राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मात्र नैराश्य पसरले आहे. पक्षाच्या निष्ठावंताना उमेदवारी मिळाली नसल्याने एक गट प्रचारापासून दूर गेला असून, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही फारसे लक्ष घातलेले नाही. शिवाय पक्षाकडे विरोधकांची मते खेचून आणणारा स्टार प्रचारकही नसल्याने काँग्रेसचे उमेदवार आपल्या बळावरच निवडणूक लढवित आहेत.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत मंत्री छगन भुजबळ हे आजारी असल्याने प्रचारात सहभागी होणार नाहीत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरच सारी भिस्त असून, नाशिकमध्ये उमेदवारांच्या प्रचारासाठी अजुन तरी त्यांचा दौरा ठरलेला नाही. अशीच परिस्थिती शरद पवार गटाची आहे. शरद पवार यांची सभा होण्याविषयी साशकता व्यक्त केली जात असून, खासदार सुप्रीया सुळे, रोहीत पवार यांच्या सभा होण्याची शक्यता आहे.
गेल्या निवडणूकीत शेवटच्या क्षणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केल्यामुळे भाजपाला विजयाचा मार्ग सुकर झाला होता. यंदाही भाजप उमेदवारांना मुख्यमंत्र्यांच्या सभेची उत्सूकता आहे. दुसरीकडे शिवसेना व मनसे एकत्र आल्याने दोन्ही पक्षांची सारी भिस्त ठाकरे बंधूंच्या संयुक्त जाहीर सभेवर आहे, २०१२ च्या मनपा निवडणूकीत राज ठाकरे यांच्या जाहीर सभांनी राजकीय वातावरण झपाट्याने बदलले व मनसेचे सर्वाधिक उमेदवार निवडून आल्याने त्यांनी भाजपाच्या मदतीने महापौरपद पटकाविले होते. त्यामुळे आता दोन्ही ठाकरे एकत्र आल्याने दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना जाहीर सभा चमत्कारीक वाटू लागल्या आहेत.