शेतकऱ्यांवर पुन्हा संकट! कांद्याच्या दरात मोठी घसरण, १५ दिवसांत १ हजार रुपयांनी दर कोसळले
लासलगावसह देशातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याने बाजारात दरांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. त्यातच बांगलादेशातील सुरू असलेल्या हिंसाचारामुळे भारतातून होणारी कांदा निर्यात मर्यादित प्रमाणातच सुरू असल्याने निर्यातीवर विपरीत परिणाम झाला आहे. तसेच अरब देशांच्या बाजारपेठांमध्ये चीन आणि पाकिस्तानचा कांदा कमी दरात उपलब्ध होत असल्याने भारतीय कांद्याला अपेक्षित मागणी मिळत नसल्याचे चित्र आहे.
सोमवारी (दि.५) सकाळच्या सत्रात लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सुमारे १२०० वाहनांद्वारे २२ हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. या कांद्याला जास्तीतजास्त २१०९ रुपये, किमान ५०० रुपये, तर सरासरी १६०० रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला.
या सर्व परिस्थितीचा फटका थेट भारतीय शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर बसत असून, एकट्या नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे गेल्या पंधरा दिवसांत अंदाजे १७५ ते २०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सतत होत असलेल्या दरघसरणीमुळे भविष्यात उन्हाळ कांद्याप्रमाणेच या लाल कांद्याचेही उत्पादन खर्च निघणे कठीण होणार असल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्य व केंद्र शासनाने तातडीने हस्तक्षेप करून कांद्याची जास्तीतजास्त निर्यात परदेशात कशी वाढवता येईल, यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.






