राज्यात हिंदी मराठी भाषा वाद चिघळ्याने दिवसेंदिवस राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच आता नवी मुंबईतील सिवूडमध्ये गुजराती भाषेतील पाटीमुळे या वादामध्ये पुन्हा ठिणगी पडली आहे. सिवूड्समधील एका राजकीय नेत्याच्या जनसंपर्क कार्यालयाची पाटी सध्या चर्चेत आली आहे, नवी मुंबईत मनसेने थेट सत्ताधारी भाजपला इशारा देत सीवूड्समधील भाजप जनसंपर्क कार्यालयाची गुजराती भाषेत असलेली पाटी मराठी भाषेत करण्यास सांगितले आहे. नवी मुंबई, सीवूड्स, सेक्टर-४२ मध्ये भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाची पाटी पूर्णपणे गुजराती भाषेत आहे.
गुजरातमधील आमदार विरेंद्रसिंग बहादूरसिंग जडेजा यांचे हे कार्यालय असून या संदर्भात माहिती मिळताच संबंधित कार्यालयाच्या ठिकाणी मनसे शहर सचिव सचिन कदम व विभाग सचिव अप्पासाहेब जाधव, उपविभाग अध्यक्ष संतोष टेकवडे आणि इतर सहकाऱ्यांसह गेले. त्यावेळी कार्यालयातील लोकांनी दरवाजा आतून बंद केला. यावरून कदम यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
Matheran News : पालिकेचे लाल मातीच्या रस्त्यांकडे दुर्लक्ष; घोडेस्वारांनी भरले खड्डे
मनसेचा इशारा
अशा पद्धतीने मराठी भाषेचा अपमान आम्ही सहन करू शकत नाही. परंतु आम्हाला शहराचे वातावरण खराब करायचे नाही. नवी मुंबईत सर्वांनी मराठी भाषा, मराठी संस्कृतीचा मान ठेवावा आणि सर्वांनी गुण्या गोविंदाने राहावे एवढीच आमची अपेक्षा आहे.” अशी प्रतिक्रिया सचिन कदम यांनी व्यक्त केली. संबंधित बाब भाजप मधील प्रमुख पदाधिकाऱ्यांस कळविली आहे. आज सांयकाळपर्यंत पाटी मराठीत होईल अशी अपेक्षा आहे. तसे न झाल्यास मनसे आक्रमक रूप धारण करेल असा इशारा सचिन कदम यांनी दिला आहे.