
नवी मुंबई/सिद्धेश प्रधान : नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट (प्रा.) लि. ही नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट (एनएमआयए) ऑपरेटर आणि नवी मुंबई बेलापुर येथील अपोलो हॉस्पिटल्स यांनी विमानतळ कर्मचाऱ्यांसाठी व प्रवाशांसाठी दिवस-रात्र आरोग्यसेवा देण्यासाठी सामंजस्य करारावर गुरुवारी स्वाक्षरी केली. विमानतळावरील कामकाज सुरू होण्यापूर्वी एनएमआयएच्या आपत्कालीन सुसज्जता आणि वैद्यकीय व्यवस्थेला बळकटी प्राप्त होणार आहे.
एनएमआयएपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर नवी मुंबईतील अपोलो रुग्णालय आहे. या करारांतर्गत हॉस्पिटल टर्मिनल १ येथे २४x७ वैद्यकीय केंद्र स्थापित करण्यास मदत करणार आहे. हे केंद्र आपत्कालीन वैद्यकीय साह्य आणि आपत्ती व्यवस्थापन सुविधांसह सुसज्ज असेल. या केंद्रामध्ये तीन डॉक्टर, आठ नर्सिंग स्टाफ आणि दोन ड्रायव्हर्स यांचा समावेश असलेली अत्यंत कुशल टीम असेल, जी सतत वैद्यकीय तपासणीसाठी सुसज्ज असेल. सर्व वैद्यकीय कर्मचारी अॅडव्हान्स्ड कार्डिओव्हस्कुलर लाइफ सपोर्ट (एसीएलएस)-प्रमाणित असतील, ज्यामधून एनएमआयएमध्ये क्रिटिकल केअरसाठी देखील अत्युच्च दर्जाची वैद्यकीय काळजी घेतली जाणार आहे.
एनएमआयएमध्ये दोन पूर्णपणे सुसज्ज इंटेन्सिव्ह केअर युनिट (आयसीयू) रुग्णवाहिका देखील असतील.ज्या साइटवर तैनात राहणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळणार आहे. याव्यतिरिक्त, हृदयविकाराच्या आपत्कालीन परिस्थितीत जलद मदत देण्यासाठी टर्मिनल्सवर ६५ ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर्स (एईडी) धोरणात्मकरित्या स्थापित केले जातील. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसह प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य देखील सुरक्षित राहणार आहे.
नवी मुंबई विमानतळामुळे छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरील भार देखील कमी होणार असल्याचं म्हटलं जात आहे. केवळ प्रवासादरम्यान लागणारा वेळच कमी होणार नाही तर आरोग्य़ाच्या दृष्टीने प्रवाशांची काळजी घेणं त्यांना गरजेच्य़ा असलेल्या वस्तू उपलब्ध करणं यासारख्या आत्यावश्यक सेवेसाठी अपोलो हॉस्पिटल सेवा पुरवणार आहे.