
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
नात्यांच्या सूक्ष्म छटा आणि अंतर्मनातील भावविश्व अतिशय हळुवारपणे उलगडणाऱ्या आगामी ‘माया’ या मराठी चित्रपटाचे बहुप्रतीक्षित शीर्षक गीत अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. मनातल्या गाठी, आठवणींची ओल आणि जिव्हाळ्याच्या नात्यांतून उमटणारी भावनिक ऊब यांना स्पर्श करणारा हा गीतानुभव चित्रपटाच्या कथेला सुरेल आणि अर्थपूर्ण रूप देतो. शीर्षक गीतातूनच ‘माया’ या चित्रपटाच्या भावविश्वाची पहिली झलक प्रेक्षकांना मिळत असून, हे गीत अंतर्मुख करणाऱ्या प्रवासावर घेऊन जाणारे ठरत आहे.
मराठी मनोरंजन विश्वात नवा अध्याय; मनवा नाईक दिग्दर्शित नव्या मराठी चित्रपटाची घोषणा
या गाण्याची धून शांत, हळवी आणि मनात रेंगाळणारी असून सुरुवातीपासून शेवटपर्यंत ती भावनिक नात्यांच्या ओलाव्याने गुंफलेली आहे. आठवणी, नात्यांची ऊब आणि भावनिक स्वीकार यांचा सुंदर संगम या गीतातून अनुभवायला मिळतो. या शीर्षक गीताला गायक पार्थ उमराणी यांनी आपल्या भावपूर्ण आवाजाने सजवले असून, या गाण्याचे संगीतही त्यांनीच दिले आहे. साधेपणातून व्यक्त होणारी संवेदनशीलता ही या गीताची खास ओळख ठरते. तर वैभव जोशी यांच्या आशयघन शब्दांतून माणसाला माणसाशी जोडून ठेवणारी ‘माया’ अतिशय प्रभावीपणे व्यक्त होते.
चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य इंगळे याबद्दल म्हणाले, “चित्रपटाचा आशय ज्या भावविश्वाभोवती फिरतो, त्याची पहिली अनुभूती प्रेक्षकांना शीर्षक गीतातूनच मिळावी, अशी आमची इच्छा होती. ‘माया’ या शब्दात असलेली ऊब, नात्यांमधील जिव्हाळा आणि मनातील गुंतागुंत हे सगळं संगीत आणि शब्दांमधून प्रामाणिकपणे मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.” तर, निर्माते नितीन प्रकाश वैद्य म्हणाले, “कथेला भावनिक अधिष्ठान देणारं आणि प्रेक्षकांना लगेच जोडून घेणारं असं शीर्षक गीत असणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. पार्थ उमराणी आणि वैभव जोशी यांनी गाण्याला दिलेली संवेदनशील हाताळणी चित्रपटाच्या भावविश्वाला अधिक समृद्ध करते.”
Baby Shower ला सजली सोनम कपूर, पारंपरिक-आधुनिक फॅशनचा सुरेख संगम; Baby Bump ने वेधले लक्ष नजर हटेना
शालिनी सिनेमाज आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन यांच्या निर्मितीखाली तयार झालेल्या या चित्रपटाचे निर्माते डॉ. सुनील दातार, अलका मधुकर दातार आणि नितीन प्रकाश वैद्य आहेत. आदित्य इंगळे दिग्दर्शित ‘माया’ हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, मुक्ता बर्वे, गिरीश ओक, विजय केंकरे आणि रोहिणी हट्टंगडी यांसारखे दिग्गज कलाकार असून, त्यांच्या व्यक्तिरेखा आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर उभ्या असलेल्या माणसांच्या भावविश्वाचे प्रभावी प्रतिनिधित्व करताना दिसणार आहेत.